अहिल्यानगर – दि.१४ – पक्षकार, विधिज्ञांच्या सहाय्याने आपली जास्तीत- जास्त प्रकरणे आप आपसात तडजोड करुन मिटविले पाहिजे. तुळशीच्या मंजिरीप्रमाणे आपण आपली संस्कृती जोपासून आपली प्रकरणे सामंजस्याने मिटवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा अंजू शेंडे यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर बार असोशिएशन आणि सेंट्रल बार असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार (दि.१४) राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन जिल्हा न्यायालय, अहमदनगर तसेच सर्व तालुका न्यायालयांमध्ये करण्यात आले. राष्ट्रीय लोकन्यायालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा अंजू शेंडे बोलत होत्या. जिल्हा न्यायाधीश क्रमांक एक- सी. एम. बागल, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधीश भाग्यश्री का.पाटील, जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा बांगर, सेंट्रल बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.अशोक बी.कोठारी, अहमदनगर बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. महेश शेडाळे, न्यायीक अधिकारी आणि वकील आदी उपस्थित होते.
प्रस्ताविकात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्या. भाग्यश्री का. पाटील यांनी लोक न्यायालयामध्ये पक्षकारांनी जास्तीत- जास्त प्रकरणे निकाली काढावीत, असे आवाहन केले. अहमदनगर बार असोशिएशन ॲड. संजय पाटील, ॲड. भक्ती शिरसाठ, ॲड. आशा गोंधळे, ॲड. अरुणा राशिनकर, ॲड. राजाभाऊ शिर्के आदी उपस्थित होते. दोन्ही बारचे सदस्य, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी लोकन्यायालयाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. ॲड. विक्रम वाडेकर यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. सागर पादीर यांनी आभार मानले.