लोकसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी काही दिवसांनी सुरु होणार आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप चिखलफेक, दावे प्रति दावे खोटी आश्वासनं, खोट्या प्रेमाचा उमाळा हे सारं चित्र येत्या काही दिवसानंतर संपूर्ण देशभर दिसणार आहे. या पार्श्वभूमीवर सामान्य माणसाची प्रतिक्रिया जर विचारात घेतली तर राज्यकर्त्यांविषयी सामान्य माणसाच्या मनात किती चीड आहे, याची जाणीव प्रत्येकाला झाल्यावाचून राहणार नाही.
एका आठवडे बाजारात भेळ विक्रेत्या महिलेची एका पत्रकारानं प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्याला वेगळाच अनुभव आला. त्या पत्रकारानं भेळ विक्रेत्या महिलेला विचारलं, ‘मावशी तुम्हाला काय वाटतं, या लोकसभेच्या निवडणुकीत कोण निवडून येईल, कोण खासदार होईल’? त्या पत्रकाराचा प्रश्न पूर्ण व्हायच्या आतच ती महिला म्हणाली, ‘सगळे मंत्री पटांगणात घेऊन हाणा. ते आमच्यासाठी आहेत, आम्ही त्यांच्यासाठी नाही. आम्ही कष्ट करुन आमचा प्रपंच चालवतो. ते मात्र नुसतीच खोटी आश्वासनं देतात.
निवडणूक आली, की गोड गोड बोलतात. आमच्या पाया पडतात. मात्र एकदा निवडणूक झाली आणि ते निवडून आले, की पाच वर्षे आम्हा मतदारांना तोंडही दाखवत नाहीत. अशा लोकांचा काय उपयोग आहे? आम्हाला आरक्षण दिल्याशिवाय आम्ही कोणाच्या प्रचाराला जाणार नाही आणि कोणाला मतदानसुद्धा करणार नाही’.
खरं तर ही प्रतिक्रिया सामान्य आणि मध्यम वर्गातल्या सर्वच वैतागलेल्या मतदारांची मोठी बोलकी प्रतिक्रिया आहे. तांत्रिक अडचणीमुळे किंवा न्यायालयीन वाद निर्माण होऊ नये, यासाठी सदर भेळ विक्रेत्या महिलेचा व्हिडिओ आम्ही व्हायरल करु इच्छित नाही. मात्र अशा प्रतिक्रियांमुळे लोकप्रतिनिधी, मंत्री या सर्वांनी खरोखरच अंतर्मुख होण्याची वेळ आता आली आहे.
यापूर्वीच्या निवडणुकीत निवडून आलेल्या विद्यमान खासदारानं पाच वर्षांच्या कालखंडात मतदारसंघात नक्की काय केलं, केंद्र सरकारच्या किती योजना राबवल्या, किती बेरोजगारांना रोजगार दिला, मुद्रा लोनच्या संदर्भात युवकांना येणाऱ्या अडीअडचणी किती आणि कशा सोडल्या, मतदारांशी किती वेळा संपर्क साधला, मतदार संघातल्या प्रत्येक तालुक्यात आयटी पार्क आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला का, लोकसभेच्या मतदारसंघात छोटे छोटे उद्योग उभारण्यासाठी किती प्रयत्न केला, याचं मंथन आता मतदारांनी खरंच करायला हवं आहे.