शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातल्या शेअर मार्केटचा मोठा बिग बुल असलेला लाडजळगावचा आणखी एक तरुण 22 कोटी रुपयांच्या रकमेसह पळून गेल्याची जोरदार चर्चा शेवगाव शहरात ऐकायला मिळत आहे.
शेवगाव तालुक्यातल्या पूर्व भागात असलेल्या लाडजळगाव येथील रहिवासी असलेल्या एका 30 वर्षीय तरुणानं ट्रेडिंग कंपनी सुरू केली. लाडजळगाव आणि गेवराई तालुक्यातल्या चकलांबा इथं दोन शाखा तो चालवत होता.
या शाखेच्या माध्यमातून त्या तरुणानं लोकांकडून आठ ते बारा टक्क्यांची आमिष दाखवून सुमारे 20 ते 22 कोटी रुपये गोळा केले होते. यामध्ये 1000 ते 1200 गुंतवणूकदार असा भला मोठा लवाजमा त्याने गोळा केला होता.
गेल्या महिन्याच्या 30 तारखेला त्यानं लग्न केलं लग्नानंतर आठ दहा दिवसांतच तो सहकुटुंब लाडजगाव गावातला त्याचा गाशा गुंडाळून मध्यरात्रीच फरार झाला. लोकांनी त्याच्याकडे सोनं गहाण ठेवून जमीन विकून ऊसाचं कारखान्याचे पेमेंट इतर बँकांकडून कर्ज काढून जास्त व्याजाच्या परताव्याच्या अमिषापोटी लाखो रुपयांची गुंतवणूक केली होती.
गेल्या महिन्यांमध्येच या तरुणानं गेवराई तालुक्यातल्या चकलांबा इथं शाखा क्रमांक दोन सुरू केली होती. लग्न झाल्यानंतर त्यानं रातोरात गाशा गुंडाळला आणि तो फरार झालाय.
एका मागोमाग शेअर मार्केटचे हे डुप्लिकेट बिग बुल फरार होत आहेत. यांच्याकडील गाड्या, त्यांचे फाईव्ह स्टार राहणे हे सर्व लोकांकडून गोळा केलेल्या पैशांमधून आहे. लोक यांच्या गोड गोड बोलण्याला भुलून आपली आयुष्यभराची कष्टाची कमाई या माजलेल्या बोक्यांच्या ताब्यात देताहेत. त्यांची अवस्था ‘तेल गेलं तूप गेल ना हाती धुपाटन आलं’ अशी आहे.