शेवगाव तालुक्यातल्या शेअर मार्केटची गेल्या अनेक दिवसांपासून जी आग धुमसत आहे, त्या आगीत अनेकांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली आहे. शेअर मार्केटच्या आडून सर्वसामान्य जनतेची जी आर्थिक फसवणूक केली जात आहे, ती होऊ नये, शेअर मार्केटचा हा कॅन्सर सगळीकडे पसरु नये, यासाठी ‘महासत्ता भारत’ हा पाठपुरावा करत आहे. यातून दोन्ही बाजू जनतेच्या समोर यायला हव्यात, हीच आमची इच्छा आहे.
दरम्यान, हाती आलेल्या माहितीनुसार शेवगाव तालुक्यात शेअर मार्केटचा जो बाजार भरला आहे, त्यामध्ये करोडो रुपयांचा ‘पोर्टफोलिओ’ असून या बाजाराला ‘मोठा’ आणि ‘वजनदार’ राजकीय वरदहस्त लाभलेला आहे. विशेष म्हणजे राजकारणातल्या दिग्गज व्यक्तिमत्वानं शेअर मार्केटमध्ये शेकडोंची आर्थिक गूंणवणूक केल्याचं यानिमित्तानं बोललं जातंय.
मुख्य शेअर मार्केटच्या आडून अनेकांनी शेवगावकरांची प्रचंड आर्थिक फसवणूक केल्याचं भयानक वास्तव आहे. यातून घाणेरड्या स्पर्धेचंही चित्र पहायला मिळत आहे. पण या घाणेरड्या स्पर्धेत सामान्य शेवगावकरांच्या खिशाला कात्री लावली जात आहे.
… तरीही ना दाद ना फिर्याद…! – शेवगावच्या शेअर मार्केटमध्ये जी काही कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल होत आहे किंवा झाली आहे, त्या अधिकृत आणि कोणाचीही आर्थिक फसवणूक न करणाऱ्या कार्यालयाविषयी आमचं काहीही म्हणणं नाही. पण यामध्ये जी घाणेरड्या स्पर्धा सुरु आहे, त्यामुळे अनेकांना रस्त्यावर आणलं आहे. मात्र प्रचंड प्रमाणात आर्थिक फसवणूक होऊनही यासाठी स्थानिक पोलिसांकडे या संदर्भात ‘ना दाद ना फिर्याद’ अशी परिस्थिती पहायला मिळत आहे.
गुंतवणुकीनंतर अशी मिळते पावती…! – शेवगावच्या शेअर मार्केटमध्ये जी आर्थिक उलाढाल होत आहे, त्यात सरळ पध्दतीनं आणि अधिकृतपणे जो व्यवहार होतो आहे, जी उलाढाल होत आहे, त्याबद्दल कोणाची कुठल्याही प्रकारची तक्रार नाही. मात्र या आडून आर्थिक गुंतवणुकीवर १७ टक्क्यांचं आमिष दाखवून जी आर्थिक लूट केली जात आहे, त्याकडे स्थानिक पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे. धक्कादायक माहिती अशी आहे की अशा लोकांकडे लाखो रुपयांची आर्थिक गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना पेट्रोल पंपांवर पेट्रोल भरल्यानंतर जशा छोट्या पावत्या दिल्या जातात, तशा पावत्या दिल्या जातात. या पावत्यांवर फक्त कंपनीचे नाव आणि गुंतवणूक केलेल्या रकमेचा उल्लेख आहे मात्र त्यावर कोणाची सहीदेखील नाही. अशा गैरप्रकारांना आळा बसण्याची खरी गरज आहे.