शेवगाव तालुक्यातल्या शेअर मार्केटमधून कोट्यवधी रुपये घेऊन फरार होण्याची मालिका थांबायचं नाव घ्यायला तयार नाही. या तालुक्यातल्या गदेवाडीचा आणखी एक जण तब्बल 30 तीस कोटी रुपये घेऊन पळाला असून यामुळे गुंतवणूकदार प्रचंड हवालदिल झाले आहेत. असा मजकूर सोसियल मिडियावर व्हायरल होतोय. तुमच्या गोपनीय विभागाला कदाचित माहीतच असेल. या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलीस यंत्रणेला आमचा जाहीर सवाल आहे, की शेवगावचे पीआय भदाणे साहेब, आणखी एक जण 30 कोटी रुपये घेऊन पळालाय. किती दिवस तुम्ही हातावर हात धरून बसणार आहात?
‘महासत्ता भारत’ वेब न्युज नेटवर्कनं तीन महिन्यांपूर्वी शेवगावच्या शेअर मार्केटमध्ये सुरू असलेल्या अभूतपूर्व गोंधळासंदर्भात वारंवार बातम्या प्रसारित केलेल्या आहेत.मात्र स्थानिक पोलिसांना अद्यापही याचं गांभीर्य वाटू नये, यापेक्षा दुसरं दुर्दैव कुठलंच नाही. प्रश्न असा आहे, की अनेक प्रकरणात पोलीस स्वतः फिर्यादी होतात. मग याच प्रकरणात पोलिसांना फिर्यादी व्हायला काय अडचण आहे? सामान्य माणसाची फिर्यादी येण्याची स्थानिक पोलीस का वाट पाहत आहेत?
शेवगाव तालुक्यातल्या गदेवाडी इथला आणखी एक बिग बुल (भामटा) शेअर मार्केटच्या नावाखाली लोकांकडून सुमारे 30 कोटी रुपये गोळा करून काल (दि.13) रात्री फरार झालाय. सर्वसामान्य गुंतवणूकदारांना फसवून कोट्यवधी रुपयांना गंडा घालण्याची इथली मालिका काही थांबण्याचं नाव घेत नाही.
शेवगावच्या स्थानिक पोलिसांचं या सर्व प्रकाराकडे अक्षम्य दुर्लक्ष होताना दिसत आहे. वास्तविक पाहता पोलीस विभागाच्या गुप्त खात्यामार्फत या प्रकाराची व शेवगाव पोलिसांची सी.आय.डी. चौकशी करायला काहीच हरकत नाही.
यापूर्वी तालुक्यातून गोरे, पातकळ, झिरपे, कोकाटे, विघ्ने यांच्यासह इतर चार-पाच जण आणि आता इंगळे अशा अनेकांनी एका मागोमाग दिवाळखोरी जाहीर केल्यानं आणि अनेक जण फरार झाल्यानं सर्वसामान्य गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक झाली आहे. तेल गेलं, तूप गेलं, हाती धुपाटनं राहिलं, अशी या गुंतवणूकदारांची अवस्था झाली आहे.
जास्तीत जास्त व्याजाच्या नादात गुंतवणूकदारांची मुद्दलच गायब झाली आहे. आता कपाळावर हात मारून घेण्याचीच नाही तर स्वतःचं तोंड झोडून घेण्याची वेळ हजारो गुंतवणूकदारांवर आली आहे. गुंतवणूकदार जर आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाल्यास याला जबाबदार कोण?
दरम्यान, गेल्या आठवड्यात फरार झालेल्या एका बिग बुलनं फेसबुकवर गुंतवणूकदारांना आव्हान केलं आहे, की मी माझी जमीन विकून तुमचे निम्मे पैसे देईल. प्रत्यक्षात त्याच्या नावावर किती जमीन आहे? त्या जमिनीला गिऱ्हाईक कधी येणार? त्याच्या जमिनीचा कधी सौदा होणार आणि त्यातून किती गुंतवणूकदारांची देणी दिली जाणार, हा खरं तर संशोधनाचा विषय आहे.
नगर शहरात सुद्धा लक्ष देण्याची गरज?
एकट्या शेवगाव तालुक्यातूनच शेअर मार्केटच्या व्यवसायातले बिग बुल आर्थिक गडबड करत आहेत, असं नाही. तर नगर शहरातदेखील अनेकांचे कोट्यवधी रुपये शेअर मार्केटमध्ये बुडाले आहेत. अशीही चर्चा नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेनं आता आक्रमक भूमिका घेण्याची नितांत गरज आहे.
शेवगाव पी.आय.ची खुर्ची नेहमीच वादग्रस्त ठरलीय!
शेवगावला पोलिस निरीक्षकपदी पीआय भदाने यांची बदली झाली आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या अपेक्षा वाढल्या की, शेवगावची गुन्हेगारी आता समूळ नष्ट होईल. परंतु अल्पावधीत शेवगावच्या गुन्हेगारीचा वाढता आलेख पाहिला तर स्थानिक लोकांचा अगदी भ्रमनिरास झाला असल्याचं नागरिकांमधून बोललं जात आहे.
… तर जनतेतून होणार पीआय बदलीची मागणी
शेवगाव पोलिस स्टेशनचे पी. आय. भदाने यांचा गुन्हेगारांवर वचक नसल्यानं लोकसभा निवडणुकीनंतर पी. आय. भदाने यांच्या बदलीची मागणी शेवगावच्या जनतेतून केली जाण्याची चर्चादेखील या निमित्तानं ऐकायला मिळत आहे.