ज्यावेळी समोरच्या विरोधकाबद्दल नकारात्मक असे काहीही बोलायला उरत नाही, तेव्हा त्याचे चारित्र्य हनन केले जाते. महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना विजयी करण्यासाठी जनतेनेच ही निवडणूक आता हातात घेतल्यामुळे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे खोट्या ऑडिओ क्लिप तयार करून लंके यांची बदनामी करण्याचे षडयंत्र रचले जात आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करणारे आणि वेळोवेळी लोकांना धमकावणारेच तथाकथित बनावट ऑडिओ क्लिपची तक्रार पोलिसांकडे जाऊन करतात, हे हास्यास्पद असल्याचे शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी म्हटलं आहे.
भाजप उमेदवार विखे यांना गोळ्या घालण्याच्या धमकीची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यानंतर महायुतीच्यावतीनं माजी मंत्री भाजप नेते शिवाजीराव कर्डिले, राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन तक्रार केली. यावर महाविकास आघाडीच्यावतीनं किरण काळे यांनी जोरदार टीका केली आहे.
काळे म्हणाले, मुळात सदर ऑडिओ क्लिप ही बनावट आहे. ही बनावट ऑडिओ क्लिप कोणी तयार केली ? कोणाच्या सांगण्यावरून केली ? ती कोणी कोणी समाज माध्यमांवर व्हायरल केली ? याच्यामागचे खरे सुत्रधार कोण आहेत ? त्यांचा नेमका हेतू काय आहे ? याची सखोल चौकशी पोलिसांनी केली पाहिजे. सत्य जनतेसमोर आणले पाहिजे.
जे स्वतः एसपी ऑफिस हल्ला प्रकरणातले आरोपी आहेत, ज्यांच्यावर स्वतःच्याच पक्षाच्या माजी केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला धमकावल्याचा आरोप आहे, असे लोक सुजय विखे यांना पोलीस संरक्षण द्या म्हणत आहेत. मुळात ज्यांच्यापासून समाजाला धोका आहे, त्यांनाच विखे बरोबर घेऊन फिरत असल्यामुळे समाजात दहशत निर्माण केली जात आहे.
हेच विखे मागील निवडणुकीत म्हणाले होते की, नगर शहरातील दहशतीचे उच्चाटन करू. ते तर त्यांनी केले नाहीच मात्र दहशत करणाऱ्यांच्याच मांडीला मांडी लावून ते बसले. आता त्यांनाच पुढे करत लंके यांच्यावर दहशतीचे खोटेनाटे आरोप करत आहेत. यावरून एकच लक्षात येते की समोर पराभव दिसू लागल्यामुळे पायाखालची वाळू यांची सरकली आहे. आता जो काही फैसला होईल तो जनतेच्या न्यायालयात १३ मेलाच होईल. कितीही चारित्र्य हनन केले, षडयंत्र रचले तरी देखील निलेश लंके हेच विक्रमी मताधिक्क्याने विजयी होतील, असा दावा किरण काळे यांनी केला आहे. नगर शहरासह ग्रामीण भागातील जनतेला विकास हवा आहे. तो करायची धमक केवळ लंके यांच्यामध्ये असल्याचं काळे यांनी म्हटलं आहे.