अहिल्यादेवीनगर (अहमदनगर) जिल्ह्याच्या राजकारणाची गंमत मोठी निराळीच आहे. एका अर्थाने या जिल्ह्याचे राजकारण गंमतीशीरच म्हणावं लागेल. कारण यापूर्वी पार पडलेल्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नगर शहराचे आमदार संग्राम जगताप हे खासदार डॉ. सुजय विखे यांचे कट्टर विरोधक आणि प्रतिस्पर्धी म्हणून त्यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यावेळी म्हणजे 2024 ची निवडणूक खूपच वेगळी आहे. कारण आमदार जगताप यांच्या खांद्यावर महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांच्या प्रचाराची धुरा असल्याचं बोललं जात आहे. आमदार जगताप यांच्याबरोबरच माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले आणि आमदार अरुण जगताप एकमेकांचे व्याही असलेले हे दोघे खासदार डॉ. विखे यांच्या प्रचारावर बारकाईनं लक्ष ठेवून असणार आहेत. अर्थात हे ओघानं आलंच म्हणा.
2019 च्या निवडणुकीत डॉक्टर सुजय विखे यांना 7 लाख 4 हजार 660 एवढी मतं मिळाली होती. तर आमदार जगताप यांना 4 लाख 23 हजार 186 मतं मिळाली होती. लोकसभेच्या यापूर्वी झालेल्या निवडणुकीत 2004, 2009 आणि 2019 मध्ये अनुक्रमे राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, भाजप आणि भाजपचं या नगर दक्षिण मतदार संघावर वर्चस्व होतं आणि आहे. या मतदारसंघाचे भाजपचे संभाव्य उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांच्या नावाची घोषणा झाली असली तरी त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून नगर पारनेर मतदार संघाचे आमदार निलेश लंके की त्यांच्या पत्नी राणी लंके या निवडणूक रिंगणात उतरणार आहेत, हे मात्र अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.
साखळी पाणी योजना, नगर शहर आणि कर्जतच्या औद्योगिक कामगारांचा प्रश्न, शेतीच्या पाण्याचा प्रश्न आणि शेवगाव पाथर्डी पाणी योजनेचा प्रश्न असे या निवडणुकीत प्रचाराचे प्रमुख मुद्दे असणार आहेत. सद्यस्थितीचा विचार केल्यास खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्याकडून यावेळच्या निवडणूक प्रचाराचे करण्यात आलेले उत्तम नियोजन, विद्यमान खासदार असल्यानं मागील विकास कामांची जमेची बाजू आणि माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, आमदार संग्राम जगताप, प्राध्यापक राम शिंदे ही दिग्गज मंडळी कल्याण सोबत असल्यानं त्यांची ही जमेची बाजू आहे.
दुसरीकडे कोरोना काळात आमदार लंकेने केलेलं मदत कार्य, देवदर्शनामुळे महिला वर्गात आमदार लंकेची उजळलेली प्रतिमा आणि सर्वसामान्य जनता आणि कार्यकर्त्यांची थेट संपर्क अशी आमदार लंके यांची बलस्थानं आहेत.