राज्य सरकार जनसामान्यांसाठी अनेक लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करत असते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही नियम आणि निकष आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करत असताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेचा लाभ कसा घ्यायचा, याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत…!
राज्य सरकारच्या या योजनेनुसार 21 ते 60 वयोगटातल्या महिलांना एक हजार पाचशे रुपये महिना मिळणार आहे. यासाठी २ लाख ५० हजार ५०० रुपयांपेक्षा कमी उत्पन्न, असा निकष आहे. यासाठी सेतू सुविधा केंद्राकडे संबंधित लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहेत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड, महाराष्ट्रात राहत असल्याचं अधिवास प्रमाणपत्र, लाभार्थी महिलेचा जन्म दाखला, रेशनकार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो आदींची आवश्यकता आहे.
दरम्यान, राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ या योजनेमुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण असलं तरी यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रं गोळा करताना महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.