नेवासे तालुक्यातल्या देवगड दत्त संस्थानचे तत्कालीन महंत आणि सद्गुरु किसनगिरी महाराजांचे उत्तराधिकारी बालब्रह्मचारी हभप भास्करगिरी महाराज हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून भाजपकडून त्यांना स्वतंत्र नेवासा विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्यात येणार, अशा आशयाची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून रंगवली जात आहे. मात्र या चर्चेला भास्करगिरी महाराजांनीच आता पूर्णविराम दिला आहे. या चर्चेसंदर्भात नेवासे तालुक्यातल्या देवगडच्या दत्त संस्थानच्यावतीनं एक महत्त्वाचा खुलासा करण्यात आला आहे.
या खुलासा पत्रात म्हटलं आहे, की १९७५ साली सद्गुरु किसनगिरी महाराजांनी या संस्थानचा उत्तराधिकारी म्हणून आमची निवड केली. गुरुंच्या आशिर्वादानं गेल्या ५० वर्षांपासून कीर्तनाच्या माध्यमातून धर्मकार्यासह अध्यात्मिक कार्य सुरु आहे. मात्र निवडणुकीची ही चर्चा ज्यावेळी कानावर आली, त्यावेळी मन प्रचंड व्यथित झालं.
राजकीय क्षेत्रात मातब्बरांकडून देशाच्या आणि राज्याच्या विकासासाठी सतत प्रयत्न सुरु आहेत. हे कार्य त्यांच्याकडून उत्तम प्रकारे घडो, अशी त्यांना सदिच्छा आहे. कुठलंही राजकीय पद उपभोगण्याची आमच्या मनात अभिलाषा नाही. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेत आम्ही आजपर्यंत भाग घेतलेला नाही आणि भविष्यातही घेणार नाही. या खुलासाच्या माध्यमातून जनतेला सांगायचं आहे, की भविष्यात कुठल्याही राजकारणात आम्ही निश्चितपणे जाणार नाही.
विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून आम्ही सुरुवातीच्या काळापासून राममंदीर मुक्तीच्या कार्यात सहभागी आहोत. एक धर्मकार्य म्हणून आमचा त्याठिकाणी सहभाग होता. अनेक राजकीय पक्षातले लोकही एक धर्मकार्य म्हणून त्या ठिकाणी आले होते. राजकारणात प्रवेश करण्याचा विचार आम्ही स्वप्नातदेखील केलेला नाही. यापुढे समाजात कुठलाही गैरसमज न पसरवता कोणीही अशा बातम्या प्रसारित करु नये, असं आवाहन या खुलासा पत्राद्वारे करण्यात आलं आहे.
आमदार शंकरराव गडाख विरुद्ध ऋषिकेश शेटे पाटील अशी होणार लढत ?
नेवासे तालुक्यात आजमितीला विद्यमान आमदार शंकरराव गडाख यांचं राजकीय प्राबल्य आहे. कारण अनेक सहकारी संस्था, साखर कारखाना, शैक्षणिक संस्था, शनिशिंगणापूर देवस्थान आणि ग्रामपंचायती गडाखांच्या अधिपत्याखाली कार्यरत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांनी आमदार गडाखांसमोर नेवासा भाजपचे युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील यांनी मोठं आव्हान उभं केलं आहे. शनिशिंगणापूर देवस्थानसह अनेक संस्थांची चौकशी लावण्यासाठी ऋषिकेश शेटे पाटील आग्रही आहेत.
ऋषिकेश शेटे पाटील हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले कार्यकर्ते आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी करा, अशा सूचना आल्याचंही ऋषिकेश शेटे पाटील यांच्या समर्थकांमधून बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र नेवासा विधानसभा मतदारसंघात आमदार शंकरराव गडाख विरुद्ध ऋषिकेश शेटे पाटील अशी लढत पहायला मिळणार आहे.