‘मी आजपर्यंत कधीही राजकारण केलं नाही. फक्त लोकहिताची कामं केली आहेत. लोकांचं माझ्यावर प्रेम आहे. मी आजपर्यंत कोणाला दुखावलं नाही. लोकांचा माझ्यावर विश्वास आहे. काहीही झालं तरी मी उभा राहणार म्हणजे राहणारच. पुढचं पुढे पाहू’, अशा शब्दांत साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी कॉलर उडवत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना लोकसभा निवडणुकीतली त्यांची भूमिका स्पष्ट केली. एक प्रकारे कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढविण्याचा निर्धारच त्यांनी यावेळी बोलून दाखवलाय.
दरम्यान, शरद पवार यांनी उदयनराजे यांची कॉलर उडवण्याची स्टाईल करुन दाखवत दिलेल्या त्या आव्हानाबद्दल विचारला असता उदयनराजे म्हणाले, ‘शरद पवार हे वडीलधारे आहेत. जे माझ्या बारशाचं जेवण जेवले आहेत, त्यांच्याबद्दल काय बोलणार? कॉलर उडवण्याची माझी स्टाईल आहे. ती तुम्ही काढून घेऊ शकता. पण लोकांचं माझ्यावर प्रेम आहे. ते तुम्ही काढून घेऊ शकत नाहीत.
वैचारिक मतभेद असले तरी माझे सगळ्यांशी चांगले संबंध आहेत. श्रीनिवास पाटील, शशिकांत शिंदे ही मोठी माणसं आहेत. त्यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत.
साताऱ्याचा पाणी प्रश्न बिकट झाला आहे. धरणाची पातळी खालवली आहे. पाऊस लवकर पडावा, अशी अपेक्षा आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे प्रश्न निर्माण होत आहेत. पण विकासकामं सुरुच आहेत. ती प्रक्रिया कधी थांबत नाही. विकासाची प्रक्रिया सतत सुरुच राहते’.