नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात खासदारकीच्या निवडणुकीचा ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ सध्या पहायला मिळत आहे. पारनेरळमचे माजी आमदार विजय भास्करराव औटी यांनी खासदार डॉक्टर सुजय विखे यांना पाठिंबा दिला असला तरी शिवसैनिकांनी लंके यांच्याच पाठीशी उभे राहण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे निलेश लंके यांचा दबदबा कायम राहिल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, विखे यांचीच ही खेळी असल्याचा आरोप केला जात असून ही खेळी परतवून लावण्यासाठी लंके यांनीदेखील मोठा डाव टाकल्याचं पाहायला मिळत आहे.
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात खासदारकीची ही निवडणूक भलतीच प्रतिष्ठेची केली जात आहे. श्रीमंतांविरुध्द गरिबांची वाटणारी ही राजकीय लढाई सर्वांच्याच औत्सुक्याचा विषय ठरली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटातल्या पारनेरच्या कार्यकर्त्यांनी नगरमध्ये बैठक घेऊन आम्ही लंकेंच्याच पाठीशी उभे आहोत, महाविकास आघाडीमध्ये कुठल्याही प्रकारची फूट पडलेली नाही, असं स्पष्टीकरण दिलंय.
विशेष म्हणजे सुजय विखे यांना पाठिंबा देण्यासाठी घेण्यात आलेल्या या बैठकीला उपस्थित असलेले पारनेरचे शिवसेना तालुका प्रमुख श्रीकांत पठारे, युवा सेना प्रमुख अनिल शेटे, महिला आघाडीच्या प्रियंका खिलारी या पदाधिकाऱ्यांनी नगरमध्ये बैठक घेऊन लंकेंच्या पाठीशी असल्याचं सांगितलं. त्यामुळे सेनापती (माजी आमदार विजय औटी) हे जरी विखेंच्या बाजूनं असले तरी सैन्य मात्र लंकेंच्याच बाजूनं असल्याचं सध्या तरी पहायला मिळत आहे.