अहिल्यादेवीनगर (अहमदनगर) जिल्ह्यातल्या अवैध धंद्याची माहिती काढून त्यांच्याविरुद्ध कारवाई करणेबाबत राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना आदेशित केले होते. नमुद आदेशान्वये पोनि आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि हेमंत थोरात तसेच अंमलदार दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, गणेश भिंगारदे, संतोष खैरे, अमृत आढाव, भाग्यश्री भिटे व उमाकांत गावडे अशांचे पथक नेमून जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करणेबाबत सुचना देवुन पथकास रवाना केले.
हे पोलीस पथक राहाता पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्दे करणा-यांची माहिती काढत असतांना दिनांक 23/03/24 रोजी सपोनि हेमंत थोरात यांना महिला नामे मड्डो सलीम शेख (रा. एकरुखे रोड, ता. राहाता) ही तिच्या कब्जात गांजा बाळगून तिच्या राहत्या घरी विक्री करते, अशी गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली.
त्यानंतर पोलीस पथकाने तात्काळ राहाता पोलीस स्टेशन येथे जाऊन पोनि सोपान काकडे व स्टाफ तसेच पंच व साधने सोबत घेवुन छाप्याचे नियोजन केले. पथकाने लागलीच बातमीतील नमुद ठिकाणी एकरुखे रोड, ता. राहाता येथे जावुन संशयित महिला नामे मड्डो सलीम शेख हिचे वास्तव्याबाबत माहिती घेतली.
तिच्या राहत्या घरासमोर जावुन खात्री करता सदर घरात 1 महिला दिवाणवर बसलेली दिसली. तिला पोलीस पथकाची ओळख सांगून तिचे नाव गांव विचारले असता तिने तिचे नाव मड्डो सलीम शेख (वय 44, रा. एकरुखे रोड, ता. राहाता) असे असल्याचे सांगितले. तिच्या घराची पंचांसमक्ष झडती घेतली असता तिच्या घरातील दिवाणमध्ये पांढरे रंगाचे गोणीत उग्र वास येत असलेला ओलसर पदार्थ बिया बोंडे, काड्या, पाने व संलग्न असलेला पाला असा हिरवे रंगाचा गांजा मिळून आला.
पोलीस पथकाने गोणीत मिळून आलेला बिया बोंडे, पाला व काडयांबाबत विचारणा केली असता तिने गोणीतील बिया बोंडे, पाला व काडया हा गांजा असून विक्रीसाठी आणल्याचे सांगितल्याने महिला आरोपी नामे 1) मड्डो सलीम शेख (वय 44, रा. एकरुखे रोड, ता. राहाता) हिचे घरात 41 हजार 200/- रुपये किंमतीचा 4 किलो 150 ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ गांजा मिळून आल्याने तो हस्तगत करुन सदर बाबत महिला आरोपीविरुध्द सहाय्यक फौजदार दत्तात्रय तानाजी हिंगडे (नेमणूक स्थागुशा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन राहाता पोलीस ठाण्यात (गु.र.नं. 162/2024) गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा सन 1985 चे कलम 8 (क) सह 20 (ब) ii (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा पुढील तपास राहाता पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, वैभव कलुबर्मे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर, शिरिष वमने, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी विभाग यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.