अहिल्यानगर जिल्ह्यासह आणि राज्यभरात विविध क्षेत्रातल्या बातम्या प्रसारित करणाऱ्या ‘महासत्ता भारत’ वेब न्युज नेटवर्कचे संस्थापक संपादक भारत पवार यांना ह्युमन राईट्स ऑर्गनायझेशन आणि भारतीय जनकल्याण प्रतिष्ठानच्यावतीनं नुकताच समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ह्युमन राईट्स ऑर्गनायझेशनचे संस्थापक आणि सेवानिवृत्त वरिष्ठ तुरुंग अधिकारी शंकर गुजर, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त डॅरियल डिसोजा, राष्ट्रीय अध्यक्ष कार्यकारी भीमाशंकर तोरमल, राष्ट्रीय उपाध्यक्ष विवेक तिवारी आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रिया कृ. वाघेरा यांनी पवार यांना समाजभूषण हे सन्मानपत्र दिलं आहे. दरम्यान, पवार यांची ह्यूमन राइट्स ऑर्गनायझेशन या संस्थेच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सुमारे चार वर्षांपूर्वी आलेल्या कोरोना महामारीच्या काळात पवार यांनी वंचित समाज घटकांना किराणा आणि औषधांची मोलाची मदत केली आहे. सामाजिक क्षेत्रात पवार यांचे योगदान मोठं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊनच्या काळात कोणालाच घराबाहेर पडण्याची परवानगी नव्हती.
मात्र सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून पवार यांनी पोलीस अधिकारी आणि सहकाऱ्यांच्या मदतीनं तृतीयपंथीय समाज बांधवांसह अन्य गरीब, गरजू मध्यमवर्गीय त्याचप्रमाणे इतर वंचित समाज घटकांना घरपोहोच किराणा उपलब्ध करुन दिला. सामाजिक कार्याबरोबरच पवार यांचं नगरच्या पत्रकारितेतदेखील मोठं योगदान आहे. ‘महासत्ता भारत’ वेब न्युज नेटवर्क राज्यभर प्रसारित करत असलेल्या बातम्यांच्या माध्यमातून पवार हे पिडित आणि अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचं काम करत आहेत.
दरम्यान, भारत पवार यांना समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच ह्यूमन राइट्स ऑर्गनायझेशनच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाल्याबद्दल समाजातील विविध स्थरातून पवार यांचं अभिनंदन होत आहे.