आजपासून (दि. 25) तपोवन रोड परिसरातल्या भिस्तबाग महालासमोरील मैदानावर सुरु होत असलेल्या महासंस्कृती महोत्सव आणि कृषी तसंच उमेद महिला बचतगट महोत्सवात अहमदनगर जिल्ह्यातल्या नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं, असं आवाहन जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी केलंय.
राज्याचे महसूलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते या महोत्सवाचा शुभारंभ होत आहे. या महोत्सवात बालनाट्यासह महाराष्ट्रातली संस्कृती, विविध नाट्याविष्कार सादर केले जाणार आहेत. याशिवाय प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले आणि अभिनेत्री वर्षा उसगावकर यांची प्रमुख भूमिका असलेलं ‘सारखं काही तरी होतंय’ या नाटकाचं सादरीकरण होणार आहे.
या महोत्सवात शासकीय विभागांची माहिती देणारे स्टॉल्स, बचत गटांचे स्टॉल्स, विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, पर्यटन, कृषी तसंच ऐतिहासिक वस्तूंची माहिती देणारे प्रदर्शनदेखील या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आहे. सकाळी 11 ते रात्री दहा वाजेपर्यंत सुरू असलेल्या या महोत्सवात सर्वांना प्रवेश मोफत आहे.