लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा व्हायला अद्याप अवधी असला तरी महाविकास आघाडीनं पुण्यातल्या मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या गटाचे कार्यकर्ते संजय वाघेरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. दुसऱ्या बाजूला महायुतीमध्ये दावे प्रतिदावे आणि रस्सीखेच सुरु असल्याचं पहायला मिळत आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघावर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) दावा केला आहे. खासदार श्रीरंग बारणे यावेळच्या लोकसभा निवडणुकीत स्वतः उमेदवार असल्याचं सांगत आहेत. तर भाजपचे बाळा भेगडेही मावळ लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) मावळचे आमदार सुनिल शेळके यांचा शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला विरोध आहे. दुसरीकडे भाजपने दोन्ही गटांच्या उमेदवारांनी भाजपच्या कमळ या चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढवावी, असा आग्रह धरला आहे. परिणामी अनेक ठिकाणी उमेदवारीचा निर्णय होऊ शकलेला नाही.