पालघरः (योगेश चांदेकर) पालघर लोकसभा मतदारसंघ महायुतीत कोणत्या पक्षाच्या वाट्याला जाणार, याबाबत अजून संघर्ष सुरू असताना आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार राजेंद्र गावित यांना पक्षातून तसेच भाजपकडून वाढता विरोध असताना येथील समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत. इच्छुकांच्या भाऊगर्दीत वाढ झाली आहे.
पालघर लोकसभा मतदारसंघ २००८ मध्ये अस्तित्वात आला. त्या अगोदर डहाणू लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात होता. या मतदारसंघावर वर्षानुवर्षे काँग्रेसचे वर्चस्व होते. दामोदर शिंगडा यांचे इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्याशी चांगले संबंध होते. पालघर लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर बहुजन विकास आघाडीने पहिल्यांदाच या मतदारसंघावर विजयाचा झेंडा उंचावला होता. वास्तविक पालघर जिल्ह्यात डाव्यांचे काम भरपूर आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष येथे प्रबळ होता; परंतु या लोकसभा मतदारसंघातून डाव्यांचा उमेदवार विजयी झाला नाही. काळाच्या ओघात भाजपने या मतदारसंघात वर्चस्व निर्माण केले. गेल्या काही वर्षात भाजप आणि बहुजन विकास आघाडी यांच्यातच संघर्ष होत राहिला. आता मात्र राज्यसभा आणि विधान परिषदेत भाजपला मदत करणाऱ्या बहुजन विकास आघाडीचा उमेदवार कुणाच्या पथ्यावर पडणार याची चर्चा सुरू झाली आहे.
डावीकडून उजवीकडे
काँग्रेस, डावे अशी वळणे घेत हा मतदारसंघ उजव्यांच्या हाती गेला. येथे भाजप आणि शिवसेनेतून खासदार झाले. या वेळी खा. गावित यांना विरोध वाढत असताना या लोकसभा मतदारसंघातील इच्छुकांची संख्याही वाढली आहे. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वाट्याला गेला आहे. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भारती कामडी यांची उमेदवारी निश्चित असल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे बहुजन विकास आघाडीकडून आमदार राजेश पाटील, मनीषा निमकर, बळीराम जाधव आदींची नावे चर्चेत आहेत.
समीकरणे बदलणार
खा. गावित यांना उमेदवारी नाकारली, तरी इथली राजकीय समीकरणे बदलणार आहेत. भारतीय जनता पक्षाचा एवढा विरोध असेल, तर उमेदवार बदलतो; परंतु मतदारसंघ भाजपला देऊ नका, असा पवित्रा शिवसेनेच्या शिंदे गटाने घेतला आहे. खा. गावित नसतील, तर शिवसेनेच्या शिंदे गटाकडेही जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष प्रकाश निकम, डॉ. विश्वास वळवी यांच्याबरोबरच आता जगदीश धोडी यांचेही नाव स्पर्धेत आले आहे. धोडी हे आदिवासी राज्य संघटक आहेत. कोकण पाटबंधारे मंडळाचे उपाध्यक्षपद त्यांनी सांभाळले आहे. त्यांना राज्यमंत्रिपदाचा त्यांना दर्जा होता. शिवसेनेचे बोईसर विधानसभा मतदारसंघाचे संघटक, दीव दमणचे संघटक म्हणून काम अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. अतिशय स्पष्ट भूमिका घेणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. पालघर जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामाबाबत त्यांनी अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाला धारेवर धरले आहे.
राजकारणाचा चढता आलेख
धोडी हे तरुण वयापासून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. सुरुवातीला खैरापाडा ग्रामपंचायतचे सरपंच, त्यानंतर पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. श्रमजीवी संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष म्हणूनदेखील त्यांनी काम पाहिजे आहे. २०१४ मध्ये त्यांनी बोईसर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोठे काम आहे. याशिवाय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील वधू-वरांचा सामुदायिक विवाह सोहळा बोईसरला आयोजित करण्यात त्यांचा मोठा सहभाग असतो. आतापर्यंत जवळपास चार हजार गरीब जोडप्यांचा विवाह त्यांनी लावून दिला आहे.
गोरगरीबांना आधार
जगदीश धोडी यांची ‘आधार’ नावाची सामाजिक संस्था आहे. याशिवाय श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातूनही त्यांनी काम पाहिले आहे. पालघर जिल्ह्यात त्यांचा दांडगा जनसंपर्क असून राज्यातील आदिवासी समाज पक्षासोबत जोडण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी टाकली होती.
मीना धनारे यांचे नाव पुढे
शिवसेनेनेकडून हा मतदारसंघ भाजपकडे आला, तर या मतदारसंघात भाजप, बहुजन विकास आघाडी आणि शिवसेनेच्या ठाकरे गटांत तिरंगी लढत होईल. तसे झाले, तर या मतदारसंघातून दिवंगत माजी मंत्री विष्णू सवरा यांचे चिरंजीव हेमंत सवरा, संतोष जनाथे, बहुजन विकास आघाडीतून भाजपत आलेले विलास तरे यांच्यासोबत आता डहाणू विधानसभेचे दिवंगत आमदार पास्कल धनारे यांच्या पत्नी मीना धनारे यांचे नावही इच्छुकांच्या यादीत आले आहे. आमदार पास्कल धनारे हे २०१४ मध्ये डहाणू विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार झाले होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वर्चस्वाखाली असलेल्या या मतदारसंघात भाजपचे कमळ फुलवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. कोरोनाने त्याचे निधन झाले. त्यांच्या पत्नी मीना धनारे या परिचारिका असून त्यांना उमेदवारी द्यावी अशी काही पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. आमदार धनारे यांच्या बाबतचा भावनिक फायदा त्यांना मिळू शकेल असे सांगितले जाते.
आर्थिक गैरव्यवहार पाठीशी न घातल्याने विरोध
दरम्यान, भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांचा खा. गावित यांना असलेला विरोध हा राजकीय स्वार्थापोटी असल्याचा आरोप खा. गावित यांच्या समर्थकांकडून केला जातो. डहाणू जनता सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहारप्रकरणी राजपूत यांना अटक झाली होती. त्यातून सोडवण्यासाठी त्यांनी गावित यांच्यावर दबाव टाकला; परंतु खा. गावित यांनी पाठीशी न घातल्याने आता राजपूत यांनी विरोध सुरू केल्याचा आरोप खा. गावित समर्थकांनी केला आहे.