महानगरपालिकेत आशा दिवस साजरा; सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या तीन आशा सेविकांनी पुरस्कार
जागतिक क्षय रोग दिनानिमित्त आयोजित रांगोळी स्पर्धेतील विजेत्या आरोग्य केंद्रांना पारितोषिके
शहराच्या व महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेत आशा सेविकांचे मोठे योगदान : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे
अहिल्यानगर – महानगरपालिकेच्या वतीने शहरात आरोग्य विषयक अनेक उपक्रम राबवण्यात येतात. यात आरोग्य सेवेसह सर्वेक्ष, उपाययोजना, जनजागृतीमध्ये आशा सेविकांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान करण्याच्या उद्देशाने आशा दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने अहिल्यानगर शहरात महानगरपालिकेच्या वतीने उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तीन आशा सेविकांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे. त्यांच्यासह सर्वच आशा सेविकांचे कार्य चांगले असल्याचे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले.
महानगरपालिकेत २५ मार्च रोजी आशा दिवस साजरा करण्यात आला. तसेच, जागतिक क्षयरोग दिनानिमित्त महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांसाठी, आशा सेविकांसाठी क्षय रोग या विषयावर जनजागृतीसाठी रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. यातील विजेत्या आरोग्य केंद्रांसह उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा सेविकांना पुरस्कार देण्यात आले. महानगरपालिकेच्या आवारात झालेल्या रांगोळी स्पर्धेतून कर्मचाऱ्यांनी क्षय रोगाबाबत जनजागृती केली.
महानगरपालिकेच्या वतीने हसीना शेख (मुकुंदनगर), सुनीता भोसले (तोफखाना) व स्वाती भणगे (केडगाव) या तीन आशा सेविकांना उत्कृष्ट कार्याबद्दल अनुक्रमे ५००१ रुपये, ३००१ रुपये व २००१ रुपये रकमेचा पुरस्कार देण्यात आला. तसेच, रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक केडगाव आरोग्य केंद्र १००१ रुपये, द्वितीय क्रमांक महात्मा फुले आरोग्य केंद्र ७०१ रुपये, तृतीय क्रमांक सिव्हिल (सावेडी) आरोग्य केंद्र ५०१ रुपये, उत्तेजनार्थ जिजामाता आरोग्य केंद्र ४०१ रुपये या विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. उपायुक्त प्रियांका शिंदे, सहाय्यक आयुक्त सपना वसावा, कविता माने यांनी या रांगोळी स्पर्धेचे परीक्षण केले.