पुण्यातल्या कल्याणीनगर भागात पहाटे झालेल्या भीषण अपघातात अनिस अवधिया आणि अश्विनी कोष्टा या तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताला जबाबदार ठरलेला बिल्डर अग्रवालचा १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या बापाविरुद्ध अर्थात बिल्डर अग्रवालविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांना या निमित्तानं एवढंच विचारवसं वाटतं, की मनोज पाटील साहेब, बिल्डर अग्रवालला कधी करताय अटक?
पुण्यात हल्ली काय चाललंय, हे सामान्य माणसाला कळेनासं झालंय. एके काळी पुणे शहर हे विद्येचं माहेरघर समजलं जायचं. मात्र विद्येच्या या माहेरघरात कोयता गॅंग, सतत होणारे रोड ॲक्सिडेंट आणि वाढती गुन्हेगारी यामुळे पुणेकरांचा जीव गुदमरला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातल्या अनेक भागांत पोलिसांनी प्रत्येक चार चाकी वाहनांची आणि ती वाहनं चालवत असलेल्यांची कसून चौकशी करण्याची वेळ आली आहे.
या चौकशीदरम्यान वाहतूक कोंडी होऊन पुणेकरांच्या त्रासामध्ये आणखी भर पडणार नाही, याची काळजीदेखील पुण्याच्या पोलिसांना घ्यावी लागणार आहे.
पहाटे झालेल्या या अपघातात दोघा जणांचा जीव गेला आहे. बिल्डर अग्रवालचा मुलगा ताशी 200 च्या वेगानं त्याची अलिशान आणि महागडी कार चालवत असल्याचं स्पष्ट झालं आहे. जागरुक तरुणांनी बिल्डर अग्रवालच्या मुलाला पकडल्यानं ही बाब समोर आली. अन्यथा या दोन्ही तरुण-तरुणीच्या अपघाताची केवळ बातमीच प्रसारित झाली असती.
अल्पवयीन मुलांना वाहनं देणाऱ्या पालकांना जबाबदार धरुन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कायद्यात तरतूद आहे. त्यानुसार या अपघाताप्रकरणी अल्पवयीन मुलगा आणि त्याचा बिल्डर असलेला बाप अग्रवाल या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या गुन्ह्यात बिल्डर अग्रवालला कधी अटक होणार, याकडे तमाम पुणेकरांचं लक्ष लागलं आहे.