मराठा समाजाचे नेते ‘संघर्ष योद्धा’ मनोज जरांगे पाटील आज (दि. २५) अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या उपोषणादरम्यान बोलविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्रचंड आक्रमक झाले. ते म्हणाले, ‘राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझा बळी हवा आहे. त्यांना जर माझा बळी हवा असेल तर इथे बसून मरण्यापेक्षा मी त्यांच्या सागर बंगल्यावर जाऊन माझा बळी देतो’, असं म्हणत जरांगे पाटील व्यासपीठावरून ताबडतोब उठून निघाले. मात्र उपस्थित अनेकांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला.
मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावं आणि सग्यासोयऱ्यांच्या विधेयकाची शासनानं अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी सोळा दिवस झाले तरी जराऐ पाटील यांचे उपोषण सुरू आहे. या उपोषणादरम्यान पत्रकारांशी बोलताना ते चांगलेच आक्रमक झाले. बारस्कर महाराजांचा नामोल्लेख टाळून त्यांनी बारस्कर हे बळीचा बकरा असून सर्व काही देवेंद्र फडणवीस हेच करत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांची साथ आहे, असा गंभीर आरोप जरांगे पाटील यांनी केला.
देवेंद्र फडणवीस जे करतील तेच महाराष्ट्रात होईल, अशी आज परिस्थिती आहे. फडवणीस यांनी जर मनात आलं तर काही क्षणातच मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागू शकतो. मात्र त्यांना मराठा समाजाला संपवायचं आहे, असा देखील आरोप जरांगे पाटील यांनी केला.
मी मराठा समाजाशी प्रामाणिक आहे. मला कुठल्याही राजकीय पक्षाचं देणंघेणं नाही. मी जे आरोप करतोय, ते एक माणूस म्हणून करत आहे. मला राजकारणात यायचं नाही, मला नेता व्हायचं नाही. मराठा समाजानं जर सांगितलं की बाजूला हो, तर एका क्षणात मी बाजूला होईल. मी काहीही केलं नाही. कोणत्याही महिलेचा अपमान केला नाही केला नाही.
माझ्यावर राज्यात एकही गुन्हा दाखल नाही. जो आहे फसवणुकीचा, त्या संदर्भात बोलताना जरांगे पाटील म्हणाले, ‘शिवछत्रपतींचं एक महानाट्य 2013 मध्ये आम्ही आणलं होतं. त्यातल्या पैशांचा काही तरी विषय आहे. मात्र त्यात माझा प्रत्यक्ष सहभाग नाही. ज्यांचा सहभाग आहे, त्यांना कोर्टानं जाब विचारावा. त्यात माझा काहीही संबंध नाही. परंतु माझ्या व्यक्तिगत आयुष्यात नाक खुपसून माझ्या सहकाऱ्यांना माझ्यापासून बाजूला केले जात असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला. दरम्यान, जरांगे पाटील हे गाडीत बसले असून त्यांची गाडी मुंबईतल्या सागर बंगल्यावर जाते की कुठे, याकडे सर्वांचं लक्ष लागल आहे.