मराठा समाजानं आरक्षणाच्या संदर्भात आतापर्यंत शांततेतचं मोर्चे काढले आहेत. मात्र बीडमध्ये जे काही झालं, ते शांततेत नव्हतं. मनोज जरांगे पाटलांविषयी माझी काहीही तक्रार नाही. त्यांच्याशी माझं अजिबात वैर नाही. पण त्यांच्या मागे जे कोण आहेत, त्यांचा बुरखा फाडण्यासाठीच खरं तर एस.आय.टी. चौकशी लावण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि. २७) सभागृहात माहिती दिली.
गृहमंत्री फडणवीस म्हणाले, जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटीत जी दगडफेक करण्यात आली, त्या दगडफेकीचे आदेश कोणी दिले, याविषयी अटक करण्यात आलेले आरोपीच आता माहिती देत आहेत. त्यामुळे या सर्व प्रकरणामध्ये नक्की कोण आहेत, हे आता हळूहळू जनतेच्या समोर यायला लागलं आहे. पोलिसांवर दगडफेक झाली, त्यानंतरच लाठीचार्ज करण्यात आला.
पोलिसांनी केलेला लाठीचार्ज महत्वाचा आहेच. पण तो कशासाठी करण्यात आला, हे तपासणं महत्त्वाचं आहे. पोलीस कोणाचे आहेत? आपलेच आहेत ना? मग दगडफेक सुरु असताना पोलिसांना मरु द्यायचं का? खरं तर यामागे कोण आहे, रसद कोणी पुरवली, पैसे कोणी दिले, जरांगे पाटलांची स्क्रिप्ट कोण तयार करतं, या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार आवश्यक आहे.
भाजप हुशार पक्ष आहे पण ते कोणाला ‘टार्गेट’ करतात, हे पाहणं महत्त्वाचं : आ. रोहित पवार
दरम्यान, एस.आय.टी. चौकशीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना आ. रोहित पवार म्हणाले, ‘जरांगे पाटील हे मराठा समाजाचे नेते आहेत. दुर्दैवानं त्यांची एस.आय.टी. लावण्यात आली. पण सामाजिक एका कार्यकर्त्याची एस. आय. टी. चौकशी करुन काय निष्पन्न होणार आहे? भाजप सरकार तसं हुशार पक्ष आहे. पण या चौकशीच्या आडून ते कोणाला ‘टार्गेट’ करत आहेत, हे एकदा पहावं लागेल.