मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावं, यासाठी पुन्हा उपोषण करणारे, राज्य सरकारला धारेवर धरणारे मनोज जरांगे आणि राज्य सरकारमध्ये पुन्हा एकदा विश्वासाचं नातं तयार झाल्याचं पहायला मिळत आहे. असं असलं तरी मराठा समाजाला न्याय मिळाला नाही तर विधानसभेच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांची प्रचंड फरफट होणार आहे, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला आहे.
मनोज जरांगे यांचं उपोषण नुकतंच स्थगित करण्यात आलं आहे. हे उपोषण सुरु असताना छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार संदिपान भुमरे, मंत्री शंभूराजे देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अंतरवाली सराटी इथं जाऊन भेट घेतली.
या भेटीत जरांगे यांनी ज्या ज्या मागण्या केल्या, त्या बहुतांशी मागण्या मंत्री शंभूराज देसाई यांनी मान्य करत त्यावर काम करायला सुरुवात केली आहे.
राज्य सरकारच्या विनंतीनुसार जरांगे यांनी काही समित्यांना मुदतवाढदेखील दिली आहे. हे काम कुठे आहे याला वेळ लागणार आहे, ही सरकारची भूमिका जरांगे यांच्या लक्षात आली आहे. लवकरच मराठा समाजाला न्याय मिळेल, अशी परिस्थिती सध्या पहायला मिळत आहे. एकूणच राज्य सरकार आणि जरांगे यांच्यामध्ये सध्या विश्वासाचं वातावरण पाहायला मिळत आहे.