मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी सुरु केलेल्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. सततच्या उपोषणामुळे त्यांची प्रकृती ढासळत असल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत जरांगे यांच्या मागणीसंदर्भात राज्य आणि केंद्र सरकार केव्हा आणि कुठला धोरणात्मक निर्णय घेणार, याविषयी सर्वांनाच मोठी उत्सुकता आहे.
उपोषणामागे शरद पवार यांचा हात?
दरम्यान, सोशल मिडियावर मनोज जरांगे यांच्या या उपोषणाविषयी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असून या उपोषणामागे शरद पवार यांचा हात असल्याचा अनेकांनी संशय व्यक्त केला असून यामध्ये किती तथ्य आहे, हा वेगळा भाग आहे.
नवनिर्वाचित मराठा खासदाराचा पाठिंबा आहे का?
जरांगे यांच्या उपोषणासंदर्भात एका वृत्तपत्रानं दिलेल्या बातमीवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. महाविकास आघाडीचे जेवढे मराठा खासदार निवडून आलेत, त्या खासदारांचा या उपोषणाला पाठिंबा आहे का, असा प्रश्न एकानं उपस्थित केला आहे.
… तर जरांगेंना उपोषण करण्याची गरजच राहणार नाही…!
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या सर्वच मराठा समाजातल्या खासदारांनी हा प्रश्न गांभिर्यानं घेतला आणि केंद्र सरकारवर दबाव टाकला तर जरांगे यांना उपोषण करण्याची गरज राहणार नाही, अशी प्रतिक्रियादेखील या निमित्तानं व्यक्त केली जात आहे.
अशक्य वाटणारी लढाई जरांगेंनी टप्प्यात आणली…!
मराठा क्रांती मोर्चा या फेसबुक पेजवरुन मनोज जरांगे यांच्या उपोषणासंदर्भात एक आव्हान करण्यात आलं आहे. यात म्हटलं आहे, की समाजाचा लढा हा खूप मोठा आहे. अशक्य वाटणारी लढाई जरांगे यांनी टप्प्यात आणली आहे. आपण जिथं असाल तिथून सपोर्ट करा.
सरकारनं लवकरात लवकर हा विषय निकाली काढावा…!
मनोज जरांगे, आपण मराठ्यांसाठी लढताय. पण आपल्या तब्येतीची काळजी घ्या. आपल्याला मुलं बाळं आहेत. विचार करा. आंदोलन करायला काही हरकत नाही. तो आपला हक्कच आहे. पण स्वतःची काळजी घ्या. सरकारने हा विषय लवकरात लवकर निकाली काढावा, अशादेखील प्रतिक्रिया सोशल मिडियावर पहायला मिळत आहेत.
महाविकास आघाडीच्या खासदारांना उपोषणाला बसवा…!
सोशल मीडियावर मनोज जरांगे यांच्या उपोषणासंदर्भात अनेकांच्या प्रतिक्रिया विचारात घेतल्यास या उपोषणाबद्दल सहानुभूती कमी पण या उपोषणावर टीका जास्त होत आहे. जरांगे यांच्या उपोषणात महाविकास आघाडीच्या सर्वच नवनिर्वाचित खासदारांना बसवा, असा सल्लादेखील एकानं दिला आहे.
खालच्या पातळीवरच्या टीका निषेधार्हच…!
सोशल मिडिया हा प्लॅटफॉर्म वापरणारा हल्लीचा मोठा वर्ग आहे. एखाद्या व्यक्तीनं विशिष्ट प्रकारची पोस्ट केली तर त्या पोस्टला अनेक जण वेगवेगळ्या स्वरुपात प्रतिक्रिया देतात. अर्थात संविधानानं दिलेला हा प्रत्येकाचा अधिकार असला तरी अत्यंत खालच्या पातळीवर दिल्या जाणाऱ्या प्रतिक्रिया कधीही निषेधार्हच आहेत, हे मात्र नक्की.