मदतीसाठी आरोपीकडेच मागितली लाच, दोन पोलिस ‘लाचलुचपत प्रतिबंधक’च्या जाळ्यात
साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुनील देसाई (५२) आणि पोलिस शिपाई विक्रम शेंडगे (३१), अशी लाचखोर पोलिसांची नावे आहेत.
मुंबई : आरोपीला मदत करण्यासाठी आणि ताब्यात घेतलेली कार सोडण्यासाठी ३५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या एमएचबी पोलिस ठाण्यातील दोन पोलिसांना लाचलुचपत विभागाने (एसीबी) रंगेहात पकडून बेड्या ठोकल्या आहेत.
साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुनील देसाई (५२) आणि पोलिस शिपाई विक्रम शेंडगे (३१), अशी लाचखोर पोलिसांची नावे आहेत.
अपघाताचे प्रकरण‘एसीबी’ने दिलेल्या माहितीनुसार, ३८ वर्षीय तक्रारदारांच्या विरोधात १६ मार्चला एमएचबी पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. या गुन्ह्यात तक्रारदार यांना मदत करण्यासाठी आणि ताब्यात घेतलेली कार सोडण्यासाठी देसाई याने ३५ हजार रुपयांची मागणी केली. त्याविरोधात तक्रारदार यांनी मंगळवारी ‘एसीबी’च्या मुख्यालयात तक्रार दिली. त्यानुसार, ‘एसीबी’च्या पथकाने पडताळणी केली असता पैशांची मागणी होत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार ‘एसीबी’ने सापळा रचला.
तडजोडीअंती २० हजारांची मागणीतडजोडीअंती साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुनील देसाई याने २० हजार रुपयांची मागणी केली. देसाईच्या सांगण्यावरून लाचेची रक्कम स्वीकारताना ‘एसीबी’ने पोलिस शिपाई विक्रम शेंडगे याला रंगेहात पकडले. याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवत देसाई आणि शेंडगे यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, दोघांच्या मालमत्तेचा लेखाजोखा ‘एसीबी’कडून काढण्यात येत आहे.