मंत्री संजय शिरसाठ साहेब, मातंग समाजाच्या उद्धारासाठी काही तरी करा; लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचं अध्यक्ष नियुक्ती करा व बजेट वाढवा…!
महासत्ता भारत / अहिल्यानगर महाराष्ट्रात असलेल्या शांतताप्रिय या राज्याच्या जडणघडणीमध्ये सुरुवातीपासूनच मोठा वाटा असलेल्या मातंग समाजाचा आर्थिक विकास होण्यासाठी राज्य सरकारने अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली. मातंग समाजातल्या सुशिक्षित तरुणांना उद्योजक होण्यासाठी किंबहुना नोकरी करणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे तरुण या समाजात निर्माण व्हावेत, यासाठी खरं तर या महामंडळाची स्थापना झाली.
परंतु सध्या या महामंडळाची आर्थिक स्थिती कठीण आहे. त्यामुळे राज्याचे समाज कल्याण मंत्री संजय शिरसाठ यांना मातंग समाजाच्या बेरोजगार, पदवीधर आणि उद्योग निर्मिती करू इच्छिणाऱ्या तरुणांचा विचार करण्याचं जाहीर आवाहन करावसं वाटतं. या महामंडळाचं बजेट वाढवून ते एक हजार कोटी करण्याची आवश्यकता आहे. मंत्री शिरसाठ यांनी याकडे लक्ष द्यावं, हीच मातंग समाजाची माफक अपेक्षा आहे.
मातंग समाजाचे सुशिक्षित पदवीधर आणि उद्योग उभारण्याचं स्वप्न पाहणारे तरुण आज आर्थिक मदतीची चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत आहेत. या तरुणांना दिलासा देण्याचे काम मंत्री सिरसाठ यांच्या हातून व्हावं, अशी देखील समाजाची अपेक्षा आहे.
या तरुणांना आर्थिक सहाय्य झाल्यास उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून हे तरुण समाजाला आर्थिकदृष्ट्या पुढे नेण्याचे काम नक्कीच करतील. मंत्री संजय शिरसाठ यांच्याकडून या समाजाच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत. या समाजाने सत्ताधारी भाजप, सेना आणि राष्ट्रवादीला अतिशय तन मन आणि धनाने मदत केली आहे. निवडणुकीच्या काळात मातंग समाज या तीनही सत्ताधारी पक्षाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा होता. याची जाणीव ठेवून मंत्री शिरसाठ यांनी या मातंग समाजातल्या तरुणांना बेरोजगारीच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मातंग समाजातल्या तरुणांमधून केली जात आहे.
अध्यक्षाची नेमणूक करा – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद बऱ्याच दिवसांपासून रिक्त आहे. त्यामुळे महामंडळाची व्यथा मांडण्यासाठी कोणी वाली नाही, त्यामुळे महामंडळ सरकारपासून पूर्णपणे दुर्लक्षित होत आहे. त्यामुळे अध्यक्षपदी तत्काळ नियुक्ती करावी.
इतर महामंडळाप्रमाणे बिनव्याजी योजना राबवावी – इतर महामंडळात बँकेमार्फत कर्जप्रकरण केले तर व्याज महामंडळ भरते. अशाप्रकारच्या कर्ज योजना महामंडळात राबवण्यात याव्या.