पालघरः भिवंडी लोकसभा मतदारसंघ अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाला गेल्यामुळे काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी आहे. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी मनधरणी केली असली, तरी आता काँग्रेस जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष नीलेश सांबरे यांच्या पाठीमागे उभे राहण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीच्या जागा वाटपात आज भिवंडीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाचे सुरेश मात्रे उर्फ बाळ्या मामा यांना सोडण्यात आली. त्यानंतर काँग्रेसमधील कार्यकर्ते अस्वस्थ झाले असून त्यांनी सुरेश म्हात्रे यांना सहकार्य न करण्याची भूमिका घेतली आहे.
सांबरे जिजाऊ विकास पार्टीतून लढणार
काँग्रेसमधून भिवंडी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढविण्याची तयारी केलेले नीलेश सांबरे यांनी जिजाऊ विकास पार्टीकडून निवडणूक लढवण्याचा निर्धार जाहीर केला आहे. आता काँग्रेस जण त्यांच्या मागे उभे राहण्याची शक्यता आहे. सांबरे यांच्या बंडामुळे आता भिवंडी लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत.
आगरी, कुणबी, आदिवासींचे प्राबल्य
भिवंडी लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यामध्ये भिवंडी ग्रामीण, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, कल्याण पश्चिम, शहापूर आणि मुरबाड या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. आगरी, कुणबी आणि आदिवासी अशा मतदारांचा भरणा असलेल्या या मतदारसंघात २००९ मध्ये काँग्रेसचे सुरेश टावरे विजयी झाले होते. त्यानंतरच्या दोन्ही निवडणुका भाजपच्या कपिल पाटील यांनी जिंकल्या. काँग्रेसच्या उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. या पार्श्वभूमीवर आता हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसला सोडावा अशी काँग्रेस जणांची मागणी होती.
सामूहिक राजीनाम्याचे काय?
काँग्रेस पक्षातून माजी खासदार सुरेश टावरे आणि काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे हे इच्छुक होते. दोन दिवसांपूर्वी वाडा येथे झालेल्या बैठकीत काँग्रेस जणांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडला नाही, तर पालघर आणि भिवंडीमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते बंड करतील, असा इशारा दिला होता. तरीही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला हा मतदारसंघ सोडण्यात आला आहे. ही जागा काँग्रेसला मिळाली नाही, तर सामूहिक राजीनामा देण्याचे इशारा दिलेले काँग्रेसचे कार्यकर्ते आता काय करणार हा प्रश्न आहे.
सांबरे, काँग्रेस अस्वस्थ
आता या मतदारसंघात भाजपचे कपिल पाटील आणि शरदचंद्र पवार गटाचे सुरेश म्हात्रे हे प्रमुख उमेदवार असले, तरी सांबरे यांच्यामुळे या मतदारसंघात आता निवडणूक तिरंगी होणार आहे. सांबरे यांना काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले होते; परंतु हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाला सुटल्याने अस्वस्थ झालेल्या सांबरे यांनी जिजाऊ विकास पार्टीमधून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. सांबरे यांनी शहापूरच्या सभेमध्येच कोणत्याही परिस्थितीत भिवंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे जाहीर केले होते.
सांबरे यांचे लक्ष्य कोण?
कोणावरही टीका न करता केवळ विकासकामांच्या जोरावर मत मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान ठाण्याच्या एका किड्यामुळे आणि त्याच्या चळवळीमुळे भिवंडी जागेची गडबड झाली, अशी टीका सांबरे यांनी केली असून त्यांचे लक्ष्य नेमके कोण हे मात्र अजून समजू शकले नाही.