पालघरः भिंवडी लोकसभा मतदारसंघात या वेळी भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीत ही जागा कुणाला द्यायचे हे अद्याप ठरलेले नाही. जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष नीलेश सांबरे या लोकसभा मतदारसंघातून आपले भवितव्य अजमावणार आहेत. सांबरे यांची सर्वांनीच धास्ती घेतली असून त्यांच्या सामाजिक कामामुळे ते कपिल पाटील यांची हॅट्रिक रोखणार का असा सवाल केला जात आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघ यापूर्वी महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला होता. या वेळेला हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाकडे जाण्य़ाची शक्यता आहे त्यामुळे आता या मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघात बैठका सुरू केल्या आहेत.
इन्स्टिट्यूशनल नेटवर्क मोठे
गेल्या निवडणुकीत कपिल पाटील हे या मतदार संघातून निवडून आले. या मतदारसंघातील मुरबाडचे आमदार किसन काथोरे यांचा पाटील यांच्या उमेदवारीला विरोध होता. त्यांचे कार्यकर्ते आता पाटील यांचा प्रचार करायला तयार नाहीत. या पार्श्वभूमी जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे आता निवडणुकीत मुसंडी मारण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सांबरे यांच्या जिजाऊ संघटनेचे संपूर्ण भिवंडी आणि पालघर लोकसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांचे जाळे आहे. इन्स्टिट्यूशनल नेटवर्क मोठे असल्याने त्यांचा संपर्क दांडगा आहे. त्यांनी आता या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्धार केल्याने मतदारसंघातील निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.
पाटील यांच्यावर सर्वंच नाराज
सांबरे यांनी फार पूर्वीपासून या मतदारसंघाची मोर्चेबांधणी केली होती.आगरी, मुस्लिम बहुल तसेच आदिवासींची मोठी संख्या या मतदारसंघात आहे. या मतदारसंघात आगरी समाजाचे नेते म्हणून कपिल पाटील यांना उमेदवारी दिली. त्यांना मंत्रिपद दिले गेले. त्यानंतर त्यात बदलही झाला; परंतु मित्र पक्षांबरोबर पाटील यांचा फारसा चांगला संबंध राहिला नाही. सांबरे यांनी मात्र सामाजिक संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी निवडणूक लढवून जिजाऊ संघटनेची ताकद दाखवून दिली आहे.
सांबरे यांचे कडवे आव्हान
सांबरे यांचे तगडे आव्हान पाटील यांच्यासमोर आहे. विक्रमगडसह अन्य नगरपालिका आणि अनेक ग्रामपंचायतीची सत्ता त्यांनी मिळवली. वेगवेगळ्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून या मतदारसंघात सांबरे यांची लोकप्रियता सिद्ध झाली आहे. विद्यार्थी, गृहिणी तसेच समाजाचे वेगवेगळ्या समाज घटकांसाठी त्यांनी सामाजिक, आरोग्य, शिक्षण, रोजगार, महिला बचत गट आदी माध्यमातून लोकांच्या जीवनाचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत केली आहे. त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. सामाजिक काम आणि त्यांची वक्तृत्व शैली तसेच त्यांचे संघटनाचातुर्य लक्षात घेतले तर त्यांची उमेदवारी ही कपिल पाटील तसेच महाविकास आघाडीसाठी ही आव्हानात्मक ठरत आहे.
सांबरे यांना उमेदवारी दिल्यास महाविकास आघाडीचा फायदा
महाविकास आघाडीचे जागा वाटप अजून ठरलेले नाही. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या गटाला हा मतदारसंघ मिळणार असल्याचे सांगितले जात असले, तरी अजून या मतदारसंघाचा तिढा सुटलेला नाही. त्यातच पालघर लोकसभा मतदारसंघात आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ आली असताना सांबरे यांनी त्यांचे ठिकठिकाणी केलेले कौतुक आणि लाभलेले वेगवेगळे फलक पाहता सांबरे यांना काँग्रेसने उमेदवारी द्यावी असा मोठा आग्रह होत आहे. काँग्रेसची उमेदवारी मिळाली तर पाटील यांना निवडून जाणे अवघड असल्याचे सांगितले जाते. या लोकसभा मतदारसंघात महायुतीचे पाच आमदार असले, तरी वैयक्तिक प्रतिमा आणि संस्थात्मक कार्यकर्त्यांचे जाळे पाहता सांबरे यांनी या मतदारसंघात पाटील यांच्यापुढे मोठे आव्हान निर्माण केले आहे. निलेश सांबरे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली, तर विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला फायदा होऊ शकतो, असे गणित मांडले जात आहे.