पालघरः भिवंडी लोकसभा मतदारसंघातून अद्याप महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा झालेली नाही. हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस की काँग्रेस हा वाद अजून कायम असताना या मतदारसंघातून काँग्रेसच्या वतीने जिजाऊ संघटनेच्या नीलेश सांबरे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. स्वतः सांबरे यांनीच तसेच सूचित केले आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या वतीने कपिल पाटील हे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. केंद्रीय मंत्री असलेल्या पाटील यांच्या विरोधात मतदारसंघात प्रचंड नाराजी आहे. एका सर्वेक्षणात त्यांच्या घराजवळचा रस्ताच नीट नसल्याने रहदारीची कशी ‘ऐशी की तैशी’ होते हे दाखवण्यात आले आहे.
एकही चांगले सरकारी रुग्णालय नाही
भिवंडी लोकसभा मतदारसंघात एकही सरकारी रुग्णालय चांगले नसल्याचे सांगितले जाते. याउलट कोणतीही सत्ता हाती नसताना सांबरे यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघात एक स्वतंत्र चांगले रुग्णालय चालवले असून त्याचबरोबर तरुणांना स्पर्धात्मक परीक्षाचे मार्गदर्शन, ‘नीट’ ची तयारी अशा माध्यमातून मोठे काम केले आहे.
महिलांचे सक्षमीकरण उपयोगाला
महिलांच्या सशक्तीकरणासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या या उपक्रमाची दखल घेऊनच त्यांनी उमेदवारी करावी, असा मतदारसंघातून मोठा आग्रह आहे. या पार्श्वभूमीवर आता सांबरे यांनी जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून केलेले संघटन त्यांना उपयुक्त ठरू शकते.
वरिष्ठांकडून उमेदवारीचे संकेत
भिवंडी लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांनी दावा केला आहे. हा मतदारसंघ अद्याप कुणाला हे ठरले नसले, तरी भिवंडी लोकसभा मतदारसंघावरचा दावा काँग्रेस सोडायला तयार नाही. त्यामुळे या मतदारसंघातून सांबरे यांना काँग्रेस उमेदवारी देण्याची दाट शक्यता आहे. स्वतः सांबरे यांनीच वरिष्ठांकडून आपल्याला तसा संकेत मिळाला असल्याचे ठामपणे सांगितले आहे.
भिवंडीत कार्यकर्त्यांचे जाळे
भिवंडी लोकसभा मतदारसंघात कपिल पाटील खासदार असले, तरी आपण त्यांचे आव्हान मानतच नाही, असे सांबरे यांनी ठामपणे सांगताना भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या विविध प्रश्नांचा उहापोह केला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ भिवंडी लोकसभा मतदारसंघातून गेली, तेव्हा सांबरे यांनी या यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत केले तसेच राहुल गांधी यांचे कौतुक केले होते. मतदार संघातील काँग्रेसच्या नेत्यांची ही सांबरे यांच्यासारख्या संघटनात्मक ताकद असलेल्या आणि कार्यकर्त्यांचे मोठे जाळे असलेल्या नेत्याला उमेदवारी द्यावी असा आग्रह आहे.
पाटील यांची हॅट्रिक हुकणार
सांबरे यांना उमेदवारी दिली तर भिवंडी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अतिशय रंगतदार होईल आणि कपिल पाटील यांचे हॅट्रिकचे स्वप्न पूर्ण होण्यात मोठ्या अडचणी येण्याची शक्यता आहे.