भाजप शहराध्यक्षांची नावे १० मे ला रोजी होणार जाहीर; नव्या नेतृत्वाकडे लक्ष
भाजपकडून राज्यभरातील पक्ष संघटनात्मक बांधणीसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले जात असून, येत्या 10 मे रोजी विविध शहर अध्यक्षांची नावे जाहीर केली जाणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने संघटना मजबूत करण्यासाठी हे पाऊल उचलले असून, पक्षात नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
सध्या विविध शहरांमध्ये इच्छुकांची चाचपणी सुरू असून, प्रत्येक जिल्ह्यातून आलेल्या अहवालांवर आधारित अंतिम यादी तयार केली जात आहे. काही ठिकाणी विद्यमान अध्यक्षांची पुनर्नियुक्ती होण्याची शक्यता असून, काही शहरांमध्ये नवीन चेहऱ्यांची वर्णी लागणार आहे. पक्षाच्या उच्चस्तरीय नेत्यांकडून या प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले आहे.
शहर अध्यक्षपदासाठी स्थानिक पातळीवर विविध नावे चर्चेत आहेत, मात्र अंतिम निर्णय हा राज्य व केंद्रातील वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीनंतर घेण्यात येणार आहे. भाजपच्या संघटनात्मक ढाच्यात शहर अध्यक्ष पदाला मोठे महत्त्व असल्याने, निवड प्रक्रियाही काटेकोरपणे पार पडत आहे.
10 मे रोजी जाहीर होणाऱ्या यादीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक शहरांतील कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता असून, कोणाला संधी मिळणार आणि कोणाला बाजूला ठेवले जाणार यावरून स्थानिक राजकारणातही खमंग चर्चा सुरू झाली आहे. भाजपने यादी जाहीर करताना स्थानिक मतभेद, सामाजिक समीकरणे आणि आगामी निवडणुकांतील प्रभाव अशा सर्व बाबींचा विचार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.