महाराष्ट्रात सगळीकडे भ्रष्टाचाराचा भस्मासूर दिवसेंदिवस चांगलाच बलवान होत चालला आहे. काही सरकारी अधिकारीच भ्रष्टाचाराच्या या भस्मासुराला पोसत असल्याचं समोर आलं आहे. अतिशय निंदनीय आणि भयंकर असं हे वृत्त असून आरटीओ अधिकारीच वाहनचोरांच्या टोळीचे सरदार निघाल्याचं समोर आलं आहे.
अमरावती आरटीओ कार्यालयातल्या तीन अधिकाऱ्यांचा या वाहनचोरांच्या टोळीत समावेश आहे. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सिद्धार्थ ठोके, प्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश वरुटे, सहाय्यक आरटीओ भाग्यश्री पाटील अशी या आरटीओ अधिकाऱ्यांची नावं आहेत. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे उपायुक्त अमित काळे यांनी या संदर्भात पत्रकारांना माहिती दिली.
वाहनचोरांची ही टोळी राज्यात वाहनं चोरायची आणि बनावट कागदपत्रांसह नोंदणी करत महाराष्ट्रात विकायचा धंदा करायची. सुदैवानं ही टोळीच पोलिसांच्या हाती लागली आहे. जावेद अब्दुल्ला शेख उर्फ मणियार (रा. किराडपूर छत्रपती संभाजी नगर) हा या टोळीचा प्रमुख आहे. जावेदसह या टोळीत शिवाजी गिरी, अनिल संकटसिंग, शेख दिलावर मन्सुरी उर्फ मामू, मोहम्मद असलम शेख आदींसह नऊ जणांचा या टोळीत समावेश आहे.
पोलिसांनी या गुन्हेगारांकडून ट्रक, हायवा, कंटेनर अशी वाहन जप्त केली आहेत. मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये या वाहनांची नोंद केल्याची माहिती आहे. हे आरोपी गाड्यांची चेसीज नंबर बदलत असत. विशेष म्हणजे हे गुन्हेगार गाडी घेण्यासाठी फायनान्स कंपनीकडून कर्जदेखील मिळवून देत होते.