जिल्हा पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांचा राष्ट्रपती पदकाने देशपातळीवर सन्मान…
PSI राजेंद्र वाघ यांना 34 वर्षांच्या कार्यकर्तृत्वाची पावती!
अहिल्यानगर – जिल्हा पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक (psi) राजेंद्र देवमन वाघ स्थानिक गुन्हे शाखा यांना पोलीस दलातील 34 वर्षांतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त या पदकांची घोषणा होते. त्यात नगर जिल्ह्यातून राजेंद्र वाघ यांचा देशपातळीवर सन्मान होणार आहे.
पोलीस दलातील ढाण्या वाघ म्हणून परिचित असलेल्या वाघ यांनी अनेक मोहिमा फत्ते केलेल्या आहेत. अतिशय प्रामाणिक, कर्तव्याप्रती जागरूक असलेला उत्कृष्ट पोलीस अधिकारी म्हणून श्री. वाघ यांची प्रतिमा आहे. जनतेशी नाळ जुळलेला एक संवेदनशील माणूस म्हणूनही त्यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. त्यांचे सर्वसामान्य जनतेशी उत्तम संबंध आहेत. त्यामुळे गुन्ह्याची उकल करण्याकामी माहितगार लोकांचे सहकार्य घेऊन त्या माध्यमातून गुन्हेगारांना वठणीवर आणण्याचे काम त्यांनी उत्तमरित्या केलेले आहे. पोलीस खात्याची प्रतिमा सामान्य जनतेमध्ये सुधारण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.
गुन्हेगारांना कायद्याची जरब बसविण्याबरोबरच तुटणारे संसार वाचविण्यासाठी, भरकटलेल्या युवकांना योग्य मार्गावर आणण्यासाठीही समुपदेशनाच्या माध्यमातून श्री. वाघ यांनी आपले महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. खाकी वर्दीतील एक संवेदनशील माणूसही त्यांच्यात पाहायला मिळतो. राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याने त्यांचा यथोचित गौरव झाला असून, याबद्दल श्री. वाघ यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांच्या कामगिरीचा थोडक्यात आढावा राजेंद्र देवमन वाघ हे नगर जिल्हा पोलीस दलात दिनांक 19 जानेवारी 1991 रोजी पोलीस शिपाई या पदावर भरती झाले. त्यांनी नगर जिल्हयातील महत्वाच्या पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत अत्यंत प्रामाणिकपणे तसेच जबाबदारीने सेवा केलेली आहे. त्यांचा जनतेशी असलेला थेट संपर्क, प्रसंगावधान व कर्तव्यावर असलेली निष्ठा यामुळे त्यांनी अनेक कठीण प्रसंगांत उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केलेले आहे.
त्यातील काही पुढीलप्रमाणे – नगर शहरात शिवजयंती निमित्ताने काढण्यात येणा-या मिरवणुकीत समाजकंटक घातपात घडवून आणण्याची शक्यता असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने श्री. वाघ यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील पंचपीर चावडी भागातील बागवान यांच्या वाड्यात छापा टाकून मोठ्या प्रमाणात अवैध घातक शस्त्रे, ॲसिड बल्ब, लोखंडी पाईप तलवारी इत्यादी जप्त करण्याकामी महत्वाची भुमिका बजावली. त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे शहरातील शिवजयंती मिरवणूकीत होणारा घातपात टाळला त्यामुळे मिरवणूक शांततेत पार पडली.
दि.27 ऑगस्ट 2003 रोजी श्री. वाघ यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, नगर शहरातील हातमपुरा या मुस्लीमबहुल भागातील मंडळाच्या फलकावर रात्रीच्या वेळी कोणीतरी अज्ञात समाजकंटकाने छत्रपती शिवाजी महाराज तसेच शिवसेने संदर्भात निंदाजनक मजकूर लिहिला आहे. सदरचा मजकूर लोकांनी वाचल्यास त्याच्या तीव्र प्रतिक्रिया शहरात तसेच जिल्हयात ताबडतोब उमटू शकतील व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकेल हे ओळखून श्री.वाघ यांनी ताबडतोब सदर ठिकाणी जात फलकावरील मजकूर पुसून टाकला व या संदर्भात वरिष्ठांना माहिती कळविली. त्यांच्या कर्तव्यतत्परतेमुळे संभाव्य कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न टळू शकला.
दि.19 मे 2009 रोजी नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत रात्रीच्या वेळी चास शिवारात मुंबई येथील व्यापा-याचे वाहन पाठीमागून आलेल्या इंडिका कारमधील आरोपींनी अडवून त्याच्याकडील 30 लाख रुपये मारहाण करुन बळजबरीने चोरुन नेले होते. श्री. वाघ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींनी केलेल्या गुन्हयांच्या कार्यप्रणालीचा अभ्यास करुन आरोपीची नांवे व त्यांचे ठावठिकाण मिळविले व घाटकोपर (मुंबई) येथे सापळा रचून आरोपी गणेश सोमनाथ सिंग व इतर तिघांना अटक करुन त्यांच्याकडून रुपये 20 लाख 90 हजार रोख व 1 लाख 38 हजार 367 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जे त्यांनी चोरीच्या पैशातून खरेदी केले होते ते हस्तगत करुन गुन्हा उघडकीस आणला.
राज्यात गाजलेल्या कांडेकर हत्या प्रकरणातील सुपा पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधायक कलम 302.34 तसेच आर्म ॲक्ट अंतर्गत दाखल गुन्ह्यातील आरोपी घटना घडल्यापासून फरारी झाले होते. श्री. वाघ यांनी सदर फरारी आरोपींची व त्यांच्या साथीदारांची गोपनीय माहिती मिळवून तपासी अंमलदारांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी व साथीदारांना गोवा, पुणे, शिरूर येथे जाऊन त्यांनी वापरलेली हत्यारे तसेच गुन्हा करण्यासाठी घेतलेल्या सुपारीची रक्कम रोख रक्कम 1 लाख 10 हजार रुपयेसह अटक करुन मोलाची कामगिरी बजावलेली आहे.
कुविख्यात दरोडेखोर ज्योतीचंद उर्फ रतन निवृत्ती भोसले हा कारागृहात शिक्षा भोगत असतांना दि.2 फेब्रुवारी 2009 रोजी पॅरोलवर सुटला होता. पॅरोलची मुदत संपल्यानंतर देखील सदर आरोपी परत कारागृहात न जाता तो पोलिसांच्या नजरे आड झाला. याच काळात त्याने बाहेर राहुन पुन्हां सक्रिय टोळी तयार केली आणि जिल्हयातील पाथर्डी, राहुरी, सोनई व नेवासा परिसरात दरोडे व जबरी चोरीसारखे गंभीर गुन्हे करुन त्या भागात प्रचंड दहशत निर्माण केली. श्री. वाघ यांनी या संदर्भात गोपनीय माहिती गोळा करुन पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोपीस दि 12 ऑक्टोबर 2011 रोजी भानस हिवरा (ता. नेवासा) या गावात अटक करुन मोलाची कामगीरी केलेली आहे.
आरोपी अनिल जगन्नाथ पवार (मूळ रा. ब्राम्हणगांव वेताळ ता. श्रीरामपूर) हा कोतवाली पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोलवर सुटला व नंतर फरार झाला. दरम्यान दि.28 डिसेंबर 2004 रोजी चितळी शिवार (ता. श्रीरामपूर) या ठिकाणी एका महिलेचा विनयभंग करुन लोक जमा झाल्याच्या कारणावरुन सदर महिलेस त्याने विहिरीत फेकून देऊन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला व तेथून तो फरार झाला. या अनुषंगाने श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात भादंवि कलम 307,354 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सदर आरोपीने दि.1 सप्टेंबर 2006 रोजी रस्तापूर शिवारात राहणारी अंबिका डुकरे या शाळकरी मुलीवर बलात्कार करुन तिचा निर्घृणपणे खून केला. या संदर्भात सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. परंतु दोन वर्षाचा कालावधी उलटूनही पोलिसांना आरोपीचा शोध न लागल्याने नगर जिल्हा पोलीस दलावर प्रसारमाध्यमांतून टीका होत होती. गुन्हयाचा तपास करुन फरारी आरोपीस अटक करण्यासंदर्भात तत्कालीन पोलीस अधीक्षक यांनी शोध पथके तयार केली. परंतु सदर आरोपी मिळून आला नाही. आरोपीस अटक करण्यासंदर्भात जिल्हयातील विविध संघटनांनी वेळोवेळी मोर्चे, रास्तारोको, निदर्शने करुन पोलीस खात्याबाबत तीव्र निषेध नोंदविला. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आरोपीस पकडण्यासाठी एक लाख रुपयाचे बक्षीस देखील जाहीर केले होते. विधानसभेत फरारी आरोपीस अटक करण्याबाबत विरोधी पक्षाने गदारोळ करुन दोन दिवस विभानसभेचे कामकाज बंद पाडले होते. परिणामतः गृहमंत्री यांनी सोनई पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच चार पोलीस कर्मचा-यांना निलंबित केले होते व सदरचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला होता. तरी देखील आरोपीस अटक करण्यास अपयश आले होते.
याच दरम्यान सदरच्या फरारी आरोपीने दि.13 ऑगस्ट 2011 रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी शिर्डीतील डोऱ्हाळे गावी एका तेरावर्षीय जयश्री डांगे या शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिचा निर्घृणपणे खून केला. तत्कालीन पोलीस अधीक्षक, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यानी गुन्हयाच्या ठिकाणास भेट देऊन फरारी आरोपीच्या गुन्हा करण्याच्या पध्दतीचा अभ्यास करुन शोध पथके तयार केली व आरोपीस अटक करण्याच्या सुचना दिल्या. श्री. वाघ यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आरोपी हा शिर्डी येथील रेल्वेस्टेशन परिसरात येत आहे. सदर बातमीची खात्री करुन वरिष्ठांनी अत्यंत नियोजनपूर्ण सापळा रचून तत्कालीन पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी व कर्मचा-यांनी (श्री. वाघ यांच्यासह) आरोपीस पकडण्यात यश मिळविले. गुन्ह्यासंदर्भात आरोपीकडे विचारपूस केल्यानंतर आरोपीने अंबिका डुकरे व जयश्री डांगे यांच्यावर बलात्कार करुन त्यांचा खून केल्याची कबुली दिली. या खटल्यात श्रीरामपूर सेशन कोर्टाने आरोपीस फाशीची शिक्षा सुनावली त्याच प्रमाणे कोपरगांव येथे मयत जयश्री डांगे प्रकरणातही न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली.
शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल दुहेरी हत्याकांडातील आरोपी पाप्या उर्फ सलीम ख्वाजा शेख (रा. शिर्डी) व त्याचे साथीदार हे गुन्हा घडल्यापासून फरारी होते. अटक होऊ नये म्हणुन सदर गुन्हयातील सर्व फरारी आरोपी आपले वास्तव्य बदलत होते. या संदर्भात श्री. वाघ यांनी त्यांचे गोपनीय माहिती मिळवून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून मुख्य आरोपी पाप्या व त्याचे दोन साथीदार यांना दि. 5 ऑगस्ट 2011 रोजी बेलवंडी फाटा परिसरात शिताफीने अटक केली. यावेळी पाप्या शेख याने वाघ व त्यांच्या साथीदारांवर जीवघेणा हल्ला केला होता .
नगर जिल्यामध्ये व परिसरात पेट्रोलपंपांवर दरोडे टाकणारे दरोडेखोर पवन युनूस काळे व त्याच्या सहा साथीदारांना दि.31 डिसेंबर 2011 रोजी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रिव्हॉल्हर्स, गावठी बंदूका, एक जिवंत काडतूस आणि पाच काडतुसाच्या रिकाम्या पुंगळ्या तसेच इतर प्राणघातक हत्यारे, गॅस कटर इत्यादी घातक साधने, रोख रक्कम व पाच मोटारसायकलीसह त्याच्याकडून अंदाजे दोन लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. या संदर्भात पोलीस ठाणे एमआयडीसी येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील सर्व आरोपींनी इतर अत्यंत गंभीर स्वरुपाचे सात गुन्हे केल्याची कबूली दिलेली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील सराईत गुंड टोळी अण्णा लष्करे, पाप्या शेखसह परराज्यातील गावठी पिस्टल तयार करणाऱ्या आणि विकणाऱ्या अशा 188 गुन्हेगारांकडून 263 जिवंत काडतुसांसह 101 एक देशी बनावटीची पिस्टल जप्त करण्यात उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.
अहिल्यानगर जिल्यातील अनेक क्लिसट गुन्ह्यातील उकल केल्याबद्दल राज्य शासनाच्या पोलिस महासंचालकांकडून 2016 मध्ये राजेंद्र वाघ यांना पोलीस पदक देऊन सन्मान करण्यात आला. क्लिसट गुन्ह्याची उकल करून गुन्हेगारांना जेलची हवा दाखवणारे राजेंद्र वाघ हे जिल्हा पोलिस दलातील एकमेव अधिकारी ठरले आहेत.
भरोसा सेल येथे कामकाज करत असताना 125 कुटुंबीय प्रकारांमध्ये समुपदेशकाची महत्त्वाची भूमिका बजावून त्यांचे संसार पुनर्स्थापित करण्यात मोलाचा वाटा उचलला व अहिल्यानगर शहरातील शाळा कॉलेज परिसरात मुलींची छेडछाड करणारे 1148 तरुण टोळक्यांचे समुपदेशन करून त्यांना अशा गोष्टींपासून प्रवृत्त केले
पाथर्डी तालुक्यातील खडकवाडी येथे अकरा वर्षापूर्वी घडलेला ना उकल खुनाच्या गुन्ह्याची उकल करून आरोपींचा शोध घेऊन अटक केली.
पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांना 370 बक्षिसे व एक लाख 64 हजार रुपये रोख रक्कम व 29 प्रशस्तीपत्रक तसेच सलगपणे सोळा वर्ष A + शेरा दिलेला आहे सन 2016 मध्ये पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी पोलीस महासंचालक पदक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. आहे. याच बरोबर त्यांच्या धडाकेबाज कारवाईची दखल अनेक सामाजिक संस्थानी घेत त्यांचा अनेक पुरस्कार देऊन सन्मानही केला आहे .
जिल्हयातील शहरी भागात विशेष करुन नगर शहर, उपनगर सावेडी भाग. श्रीरामपूर शहर, शिर्डी या भागात अनेक चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल झालेले होते. श्री. वाघ यांनी विशेष कौशल्य वापरुन आता पावेतो ३६ घरफोड्या गुन्ह्यात सहभाग असलेल्या १५६ गुन्हेगारांना अटक करुन त्यांच्याकडून दिडकोट रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. याशिवाय अस्तित्त्वात असलेली बबलू गँंग व त्याच्या चार साथीदारांना अटक करुन अंदाजे पाच लाख रुपये किंमतीचे सोने व इतर मुद्देमाल जप्त केलेला आहे.अशा अनेक कारवाया पार पाडण्यात श्री. वाघ यांची सक्रिय भूमिका राहिलेली आहे.
या पुरस्काराबद्दल नाशिक परिक्षेत्र विभागाचे पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे,पोलीस उपअधिक्षक अशोक राजपूत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांचे मार्गदर्शन लाभले