पुण्याच्या कल्याणीनगरमध्ये दारु पिऊन कार चालवत असलेल्या अल्पवयीन मुलानं दोघांना उडवून दिल्याचा गुन्हा दाखल होताच अल्पवयीन मुलाचा बाप असलेल्या ब्रह्मा बिल्डर्सचा विशाल अग्रवाल याला पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेतलं आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो गायब झाला होता. पण नंतर त्याला ताब्यात घेण्यात आलं.
पुण्याचे अप्पर पोलीस कमिशनर मनोज पाटील यांच्याशी ‘महासत्ता भारत’ वेब न्युज नेटवर्कनं संपर्क साधून या कार्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. दरम्यान, ‘महासत्ता भारत’नं कालच (दि. २०) ‘मनोज पाटील साहेब, बिल्डर अग्रवाल ला कधी अटक करताय’? या ठळक मथळ्याखाली सविस्तर बातमी केली होती. योगायोगानं या बातमीच्या दुसऱ्याच दिवशी बिल्डर अग्रवालला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची बातमी येऊन धडकली.
बिल्डर विशाल अग्रवाल याच्या अल्पवयीन मुलानं दारुच्या नशेत वेगानं गाडी चालवत दोघांना उडवलं. यामध्ये अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्ठा यांचा मृत्यू झाला. मध्यरात्रीच्या सुमारास पुणे येथील कल्याणीनगर परिसरात हा गुन्हा घडला होता. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याला दहा तासांनी जामीन दिला होता.
जामीन देताना पाच अटींचे पालन करावे अशी अट घातली होती. त्यामुळे लोकांनी टीका केली आणि त्यानंतर बिल्डर विशाल अग्रवालला अटक करण्यात आली.
दरम्यान, विशाल अग्रवाल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर तो ‘नॉट रिचेबल’ झाला होता. त्याच्या शोधात पोलीस पथके रवाना करण्यात आली. पुणे, रत्नागिरी, दौंड आणि शिरुर या भागात त्याचा तपास केला जात होता. पुणे पोलिसांना तो सापडत नव्हता. पण नंतर छत्रपती संभाजीनगरच्या दिशेनं तो जात असल्याची माहिती समजली. त्याला गाडीतूनच पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेतलं पुण्याला नेलं. त्याला लवकरच कोर्टात हजर केलं जाणार आहे.