पालघर – (योगेश चांदेकर ) – डहाणू तालुक्यातील डेहणे पाटील पाडा केंद्र येथील शाळेतील व्यंकट मेतलवाड यांनी अनुसूचित जमातीचा बोगस दाखला सादर करून प्राथमिक शिक्षकाची नोकरी मिळवली असून बोगस दाखल्याच्या आधारे आदिवासी जमातीसाठी असलेले फायदे बाहेरच्या जिल्ह्यातून पालघर या आदिवासी जिल्ह्यात येऊन मिळवले. पोलिस दक्षता पथकाने तसेच उपविभागीय जात पडताळणी समितीने मेतलवाड यांचा जातपडताळणी समितीचा दाखला अवैध ठरवला असतानाही पालघर जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग त्यांना का पाठीशी घालते आहे, असा प्रश्न पडतो.
मेतलवाड हे तेलुगु समाजाचे असूनही त्यांनी तसेच त्यांच्या अन्य नातेवाइकांनी अनुसूचित जमातीचे असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी शाळेच्या दाखल्यांच्या नोंदीमध्ये खाडाखोड केली. मेतलवाड यांच्या दाखल्यांबाबत तसेच जातपडताळणी अहवालाबाबत मिळालेली माहिती विस्मयचकित करणारी आहे.
नातेवाइकांचे दाखलेही बोगस! – व्यंकट जळवा मेतलवाड यांनी अनुसूचित जमातीचा खोटा दाखला सादर करून जवळजवळ अनेक वर्षे नोकरी केली आहे. त्यांचे चुलत भाऊ, वडील, बहीण, आजोबा, आत्या तसेच अन्य संबंधितांच्या दाखल्यांची व पुराव्यांची सत्यता पडताळणी करण्यात आली. दक्षता पोलिस पथकाकडे हे काम सोपवण्यात आले होते. त्यांनी अर्जदार तसेच त्याच्या अन्य नातेवाइकांचे मूळ दस्तावेज तपासले असता त्यांच्या जातीमध्ये मुनुरवाड, मुनूर, मुनूरवारलू, माळी असे वेगवेगळे उल्लेख आढळतात.
रुढी, परंपराही भिन्न! – पोलिस दक्षता पथकाच्या चौकशीच्या वेळी अर्जदार व त्याच्या नातेवाइकांनी सादर केलेल्या कागदपत्रांची तसेच त्यांच्या चालीरीती, रूढी, परंपरा सणवार, नातेवाइकांची आडनावे, नृत्य प्रकार, बोलीभाषा आदींची माहिती तपासण्यात आली. त्यात मनेरवारलू ही जात अनुसूचित जमातीशी सुसंगत नसल्याचा शोध या संशोधन अधिकाऱ्यांना लागला.
फायदे लाटण्यासाठी हेतुपुरस्कर बदल! – अर्जदार व त्यांच्या आई-वडिलांनी याबाबत आणखी काही कागदपत्रे व पुरावे सादर करून वकिलामार्फत म्हणणे मांडले. पाळा (तालुका मुखेड जिल्हा नांदेड) येथील शाळेतील काही नोंदी व पुरावे पुढच्या सुनावणीत तपासण्यात आले. अर्जदार आणि त्याच्या नातेवाइकांच्या शालेय दस्तावेजातील नोंदी या 1988 ते 2007 या अलीकडच्या कालावधीतील आहेत. मनेरवारलू या अनुसूचित जमातीच्या योजनांचे फायदे मिळवण्यासाठी हेतूपुरस्कर अलीकडच्या काळात काही नोंदी करण्यात आल्या. 1961 ते 1976 या कालावधीतील त्यांच्या नातेवाइकांच्या शालेय नोंदी संशोधन पथकाने शोधून काढल्या.
उच्च न्यायालयाचे निरीक्षण! – महाराष्ट्रात विशेष मागास प्रवर्गात समाविष्ट तेलुगू भाषिक मुनूर व तत्सम जाती समूहाचा मनेरवारलू या अनुसूचित जाती समूहाची कोणताही संबंध आढळलेला नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने चंद्रकांत पडलवार विरुद्ध महाराष्ट्र शासन या प्रकरणी दिलेल्या आदेशात मुनूर हा जातीसमूह मनेरवारलू या अनुसूचित जमातीपेक्षा भिन्न असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे.
शालेय यंत्रणा दस्तावेज बदलात सहभागी! – पोलिस दक्षता पथकाच्या चौकशी दरम्यान काही दस्तावेजात लू, रू, ही अक्षरे वेगळ्या हस्ताक्षरात व शाईत लिहिल्याचे आढळले आहे. शालेय यंत्रणेच्या मदतीने शाळेतील नोंदीत फेरबदल करण्यात आल्याचा ठपका पोलिस दक्षता पथकाने ठेवला आहे. याचा अर्थ अलीकडच्या कालावधीत नियमबाह्यरित्या फेरबदल करून मनेरवारलू अनुसूचित जमातीचा दावा करीत त्यांनी सर्व फायदे लाटल्याचे आढळून आले. मेतलवाड यांनी तर शालेय दाखले बरोबर असून दक्षता पथकाचा अहवालच चुकीचा असल्याचा आक्षेप घेतला होता; परंतु दक्षता समितीने महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग व अन्य विभागाकडून मिळवलेल्या माहितीनुसार तेलुगु समाज राज्याच्या वेगवेगळ्या भागात स्थायिक झाला आहे. विशेषता हा समाज तेलंगणातून आला असून त्याची मातृभाषा तेलुगु आहे. महाराष्ट्रात शंभर दीडशे वर्षांपूर्वी येऊन हा समाज स्थायिक झाला आहे. सोलापूर, नांदेड, अहमदनगर, चंद्रपूर, यवतमाळ, परभणी, पुणे, मुंबई, शिरूर आणि छत्रपती संभाजीनगर या भागात या समाजाची वस्ती अधिक आहे असे दक्षता पथकाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
आडनावे वेगळी, देवताही भिन्न! – दक्षता पथकाने राष्ट्रीय जनगणना अभिलेखाचे अवलोकन केले. अर्जदाराचे चुलत आजोबा, पणजोबा, वडिल, आत्या आदींच्या नोंदी तपालल्या, मुनूरवाड व तत्सम जातीसमूहापैकी असताना व्यंकट मेतलवाड यांनी मात्र मनेरवारलू या अनुसूचित जमातीचा असल्याचा दाखला सादर करून नोकरी व तदअनुषंगिक फायदे उपटले. त्यांना कागदपत्राच्या आधारे मनेरवारलू अनुसूचित जमातीचे असल्याचा दावा सिद्ध करता आला नाही. हा शिक्षक मूळचा कर्णा (तालुका मुखेड जिल्हा नांदेड) येथील असून मनेरवारलू या अनुसूचित जमातीचे कोणीही येथे वास्तव्यास नसल्याचे आढळून आले आहे. अर्जदाराने त्यांच्या समूहातील सादर केलेली आडनावे मनेरवारलू अनुसूचित जमातीमध्ये आढळून येत नाहीत तसेच त्यांच्या कुलदेवता या मनेरवारलू अनुसूचित जमातीमध्ये नाहीत, असेही दक्षता पथकाला आढळले आहे
जातप्रमाणपत्र रद्द, तरीही नोकरीवर! – व्यंकट जळवा मेतलवाड यांचा मनेरवारलू अनुसूचित जमातीचा दावा उपविभागीय जात पडताळणी अधिकाऱ्यांनी फेटाळून लावला आहे व त्याचे जातप्रमाणपत्र रद्द केले आहे, असे असताना मेतलवाड यांनी पंचायत समिती व जिल्हा परिषदेची फसवणूक केली आहे. मूळ जाती विषयी माहिती लपवून खोट्या माहितीच्या आधारे अनुसूचित जमातीच्या उमेदवारासाठी राखीव असलेल्या सेवा सुविधांचा लाभ घेतला. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचा आदेश संशोधन अधिकारी हितेश वाळले, सचिव चेतना मोरे आणि सह आयुक्त विजयकुमार कटके यांनी दिला असतानाही डहाणू येथील गटशिक्षणाधिकारी या अहवालाकडे का दुर्लक्ष करताहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे.