नगर – मनमाड महामार्गालगतचं अत्यंत गजबजलेलं, सतत वर्दळीचं आणि प्रचंड अतिक्रमणाचं शहर म्हणजे राहुरी शहर. राहुरी एसटी बसस्थानक आणि कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयासमोर या महामार्गालगत जी काही दुकानं आहेत, त्या दुकानांचे छोट्या आकाराचे लोखंडी फलक थेट या महामार्गाच्या मध्यापर्यंत आणून ठेवलेले असतात. हे कमी म्हणून की काय, या परिसरात रिक्षांचंदेखील प्रचंड अतिक्रमण आहे. याकडे स्थानिक पोलिसांचं दुर्लक्ष असल्याचा आरोप तर नेहमीच होत असतो. एकूण काय, तर शनिवारी दि. 18 मे रोजी सायंकाळी जो अपघात झाला आणि त्या अपघातात ज्यांना जीव गमवावा लागला, ते राहुरीचे व्यापारी आणि माजी नगरसेवक कुंदनमल मानकचंद सुराणा यांचा बळी बेजबाबदार व्यवसायिक, अतिक्रमणधारक आणि स्थानिक पोलीस यांनीच घेतला असल्याचं स्पष्ट झालं आहे.
मयत कुंदनमल सुराणा हे राहुरी बसस्थानकासमोरुन जाणाऱ्या कंटेनरखाली सापडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे नगर मनमाड या राज्यमार्गावर राहुरी बसस्थानकासमोर गतिरोधक आणि सिग्नल्ससुद्धा नाहीत. या भागातल्या दुकानाचे फलक थेट महामार्गाच्या मध्यभागापर्यंत आणून ठेवले जातात. यातच रिक्षाचंही या ठिकाणी मोठं अतिक्रमण आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर नगर – मनमाड राज्यमार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी गाडगे बाबा आश्रम शाळेपासून राहुरीच्या जुन्या बसस्थानकापर्यंत आणि त्याहीपुढे असलेली अतिक्रमणं कायमस्वरुपी काढून टाकण्यात यावी, अशी मागणी राहुरीच्या व्यापारी बांधवांसह स्थानिक नागरिकांनी केली आहे.