हल्लीची पत्रकारिता किती रसातळाला चाललीय, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्याकडून ठराविक आणि अर्धवटराव असलेल्या पत्रकारांना ‘अरे गधड्यांनो’ असं विशेषण ऐकावं लागणं. यात राज ठाकरेंची काडीमात्रही चूक नाही. कारण कुठलीही माहिती न घेता किंवा विषयाचं गांभीर्य समजून न घेता या पत्रकारांनी ‘राज ठाकरे यांनी शिंदे यांच्या शिवसेनेचं प्रमुखपद भूषवावं’, असे अकलेचे जे तारे तोडले, त्यामुळे खरं तर राज ठाकरेच काय, पण कोणाचंही पित्त खवळल्याशिवाय राहणार नाही. आता पत्रकारांचा अपमान झाला म्हणून राज ठाकरे यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा जाहीर निषेध करण्याची कोणत्याही पत्रकार संघटनेची हिंमत होईल, असं आम्हाला तर या क्षणी वाटत नाही.
‘राज ठाकरे दिल्लीला गेले, त्यांना बारा तास वाट पाहावी लागली’, ‘दिल्लीला जाणारे राज ठाकरे पहिलेच’, ‘राज ठाकरेंनी शिंदे शिवसेनेचे प्रमुखपद भूषवावं’, या मिडियाच्या बातम्यांची राज ठाकरे यांनी खरपूसपणे जी दखल घेतली, जाहीर भाषणात पत्रकारांना ज्या कानपिचक्या दिल्या, त्या सगळ्यांचं वास्तविक पाहता कौतुकच करायला हवंय.
पत्रकारितेचे जनक असलेले कै. बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्रकारितेला समाजसेवेचं व्रत असं म्हटलेलं आहे. मात्र सेवा सोडून भलत्याच मखलाशा करणाऱ्या आणि अशा विचित्र बातम्या देणाऱ्या मिडियातल्या पत्रकारांच्या बुध्दीची जाहीरपणे चिरफाड करण्याची ही अशी धमक एकटे राज ठाकरेच दाखवू शकतात, हेदेखील तितकंच खरं आहे.
आता ‘गधडे’ या शब्दाविषयी थोडसं…!
मातीची भांडी तयार करण्यासाठी लागणारा पोयटा किंवा पोयट्याच्या प्रकारातली माती पाठीवर वाहून नेण्याचं काम जे प्राणी करतात, त्यांना खरं तर गधडे, गर्दभ किंवा गाढव असं म्हटलं जातं. मग काही अर्धवट पत्रकारसुध्दा दुसऱ्यांची ओझी पाठीवर वाहतात. म्हणून हा शब्द अशा पत्रकारांना चपखलपणे लागू होतो.
अरेरे ! काय होतास तू …? काय झालास तू…?
फार पूर्वी म्हणजे 25 ते 30 वर्षांपूर्वी पत्रकार म्हटलं, की सरकारी अधिकारी सुतासारखं सरळ व्हायचे. पोलीस ठाण्यात पत्रकारांची ‘एन्ट्री’ होताच पोलीससुद्धा डोक्यावरची टोपी व्यवस्थित करायचे. सरकारी अधिकारी मोजून मापून बोलायचे. भ्रष्टाचारी अधिकारी पत्रकारांच्या समोरदेखील येत नव्हते. इतका पत्रकारांचा दबदबा होता. परंतु आजमितीला पत्रकारितेची ही अशी दुरवस्था झाल्यानं ‘काय होतास तू ? काय झालास तू’? असंच म्हणावंसं वाटतं.