आपल्या देशाच्या राज्यघटनेची निर्मिती झाल्यानंतर परिस्थिती आणि काळानुसार हळूहळू वेगवेगळे बदल झाले आहेत. बदल करणं, हे प्रगतीचे लक्षण आहे. त्यामुळे आपली राज्यघटना बदलणं ही चूक नाही तर योग्य आणि आवश्यक आहे, असं वादग्रस्त विधान रामायण मालिकेत प्रभू श्रीरामचंद्रांची भूमिका करणारे अभिनेते अरुण गोविल यांनी केलं आहे.
अरुण गोविल हे मेरठमधून लोकसभेची निवडणूक लढवित आहेत. ‘कोणा एका व्यक्तीच्या विचारानुसार घटनेत बदल होऊ शकत नाही. मात्र सर्वांच्या संमतीनं राज्यघटनेत बदल व्हायला हवा’, असंही ते म्हणाले. मेरठच्या प्रचारादरम्यान अभिनेते अरुण गोविल यांचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी गोविल यांचा व्हिडिओ शेयर केला आहे.
… तर जनता डोळे काढून घेईल : लालूप्रसाद यादव
भारतीय जनता पार्टीचे नेते निवडणुकींना घाबरले आहेत. त्यांनी आतापासूनच पराभव मान्य केला आहे जनतेचे मनोबल ढासळविण्यासाठी ते ‘अबकी बार 400 पार’चा नारा देत आहेत. ते सातत्यानं संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. मात्र यासाठी कोणी जर प्रयत्न केलाच तर जनता त्यांचे डोळे काढील’, असा इशारा राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी दिला आहे.