‘मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावं, सग्यासोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी व्हावी, ही मराठा समाजाची मागणी आहे. सरकारने ती मान्य देखील केली आहे. परंतु हा विषय आणि मराठ्यांचं आंदोलन मोडीत काढण्यासाठी देऊ सरकारने दहा टक्के आरक्षण केलं. पण ते दहा टक्के आरक्षण कोर्टात टिकणार नाही आणि ते आरक्षण आम्हाला नको, आमची ती मागणीदेखील नाही. मात्र मी सरकारचं ऐकत नाही, असं लक्षात आल्यावर माझ्याविरुद्ध गुन्हे दाखल करून मला अटक करण्याची भाषा करण्यात आली. सत्तेच्या जोरावर तुम्ही काहीही करा. पण माझ्या जातीला ओबीसीतूनच आरक्षण दिल्याशिवाय मी मागे हटणार नाही’, असा निर्वाणीचा इशारा मराठा समाजाचे नेते ‘संघर्ष योध्दा’ मनोज जरांगे पाटील यांनी परभणीतून बोलताना दिलाय.
मराठा आरक्षणाच्या विरोधात जे जे बोलले, त्या सर्वच मंत्र्यांचं नाव न घेता त्यांनी खरपूस समाचार घेतला. जरांगे पाटील म्हणाले, ‘मी कोणाला बोललो? भाजपला आणि भाजपच्या नेत्याला बोललो. मग तुला राग यायचं काय कारण? तुझा नेता आणि पक्ष मोठा की तुझी जात मोठी? वास्तविक पाहता तू जातीकडून बोलायला पाहिजे होतं. मात्र तुझं राजकारण शाबूत रहावं म्हणून तू नेत्याकडून बोलला. मला अटक करण्याची मागणी केली. मग आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत तुझा नेता तुला निवडून आणील की मराठा समाज निवडून आणील? आता मराठा समाज तुला मतं देईल का? मराठा आरक्षणाच्या विरोधात केवळ राजकारणापायी बोलून समाजाचा रोष तु ओढून घेतला आहेस. असं करताना तुला लाज वाटायला पाहिजे होती’.
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून जरांगे पाटील म्हणाले, ‘मी आई बहिणीवर शिव्या दिल्या, याचा तुम्हाला राग आला. सततच्या आमरण उपोषणामुळे पोटात अन्नाचा कणही नव्हता. त्यामुळे चीडचीड झालीही असेल आणि त्यातून हे झालं असेल. पण आमरण उपोषणाचं गांभीर्य तुम्हाला कळणार नाही. माझ्यासोबत आठ दिवस उपोषण करून पहा, म्हणजे तुम्हाला कळेल. चीडचीड झाल्याने मी शिवी काय केलीही असेल. पण अंतरवाली सराटीमध्ये माझ्या आया बहिणींची डोकी फोडली, त्यांना गोळ्या घातल्या. त्यांच्या गुडघ्यात अजूनही गोळ्या आहेत. डोक्याला 36 टाके पडले. त्यांना अजूनही चालता येत नाही. माझ्या आया बहिणीवर अमानुषपणे गोळीबार करण्यात आला, यावेळी तुम्हाला आई बहीण आठवली नाही का? तुमची ती आई बहीण आणि आमची ती कोणीच नाही का? असं सुडाच राजकारण तुम्ही का करता? तुम्ही काहीही केलं तरी मी ‘मॅनेज’ होणार नाही. माझ्या जातीला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी मागे हटणार नाही’.