पालघरः रक्तदान हे पवित्र दान आहे.रक्तदानातून दुसऱ्यांना जीवदान मिळते ही जाणीव फार कमी लोकांना असते. आपल्याकडे रक्तदानाबाबत गैरसमज अधिक आहेत. अशा परिस्थितीत रक्तदाता ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रा. किरण थोरात यांनी रक्तदान चळवळ सुरू केली असून त्यांनी स्वतःच शंभर वेळा रक्तदान करून शतकवीर रक्तदाता होण्याचा सन्मान मिळवला आहे.
वाडा येथील ग्रामीण रुग्णालयात नुकताच प्रा. थोरात यांचा शतकपूर्ती रक्तदान सोहळा झाला. त्यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त त्यांनी शंभराव्या वेळी रक्तदान केले, तर त्या वेळी आयोजित शिबिरात ८७ जणांनी रक्तदान करून प्रा. थोरात यांना आगळ्यावेगळ्या शुभेच्छा दिल्या. प्रा. थोरात सोनोपंत महाविद्यालयात क्रीडा संचालक आहेत.
छंद हा लागे जीवा
या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार म्हणून ‘रोटरी क्लब क्लब ऑफ वाडा च्या वतीने विशेष सन्मानपत्र देऊन प्रा. थोरात यांचा सत्कार करण्यात आला. अनेकांना वेगवेगळे छंद असतात. कुणी गड किल्ल्यांची भटकंती करण्यात समाधान मानतो. कोणी ट्रेकिंग करतो. कोणाला चित्रकलेचा छंद असतो. काहींना गाण्यांचा छंद असतो, तर काहींना टपाल तिकिटे जमवण्याचा. छंद वेगळे असतात; परंतु त्याची अनुभूती वेगवेगळ्या प्रकारची असते. अशाच एका ध्येयवेड्या छंदाने प्रा. थोरात यांना पछाडले आहे.
३२ वर्षांपासून रक्तदानाचा यज्ञ
प्रा. थोरात यांनी गेल्या ३२ वर्षापासून रक्तदान चळवळ हाती घेतली आहे. आतापर्यंत शंभर वेळा रक्तदान करून त्यांनी आदर्श रक्तदाते तयार करताना पालघर जिल्ह्याच्या बहुतांश आदिवासी ग्रामीण भागामध्ये घर तेथे रक्तदाता निर्माण करण्याची चळवळ हाती घेतली असून आत्तापर्यंत पालघर जिल्ह्यात त्यांनी २५ हजार रक्तदाते तयार केले आहेत. या कार्याबद्दल त्यांना रक्तकर्णा ही उपाधी तसेच ‘ॲडी हायमन इंडियन आयकॉन’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
माणूस जगवण्यासाठी
माणूस जगला पाहिजे या छंदाने पछाडलेल्या प्रा. थोरात यांनी इतरांच्या जगण्यास आपण काय मदत करू शकतो. रक्तदानातून इतरांना कसे जीवदान मिळू शकते हा संदेश जनमानसात पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या रक्तदानाचा सोहळा यशस्वी होण्यासाठी आई एकविरा गोविंदा पथक, गावदेवी गोविंदा पथक, वाडा येथील इंडियाना फाउंडेशन, संवाद संस्था आणि रक्तकर्णा रक्तदाता ग्रुप यांनी विशेष मेहनत घेतली.