प्रदूषण महामंडळातली आर्थिक ‘गडबड’ ‘एसीबी’ला का दिसत नाही?
महासत्ता भारत / अहिल्यानगर
अहिल्यानगरच्या सावेडी उपनगरातल्या टीव्ही सेंटर परिसरात महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे कार्यालय आहे. या कार्यालयात जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. मात्र एवढं असूनसुद्धा या कार्यालयात मोठ्या प्रमाणात आर्थिक ‘गडबड’ सुरू असते. विशेष म्हणजे याच भागात अगदी हाकेच्या अंतरावर अँटी करप्शन विभागाचे कार्यालय आहे. मात्र अँटी करप्शन विभागाच्या नाकावर टिच्चून महाराष्ट्र प्रदूषण मंडळात दलालांच्या मार्फत आर्थिक ‘गडबड’ सुरू असते. ही आर्थिक गडबड अँटी करप्शन विभागाला का दिसत नाही, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
अधिकारी व दलालांची मिलीभगत – येथील कर्मचारी उद्योगांना संमती पत्र घेण्यासाठी आलेल्या उद्योजकांना स्वतः अर्ज भरून न देता जाणीवपूर्वक ओळखीच्या दलालांकडे पाठवितात. जेणेकरून त्यांचेतील आर्थिक देवाणघेवाण सोपी जावी हा हेतू असतो. या कार्यालयात येणारे दलाल यांचे कुठलेही उद्योग व्यवसाय नसतात वारंवार येणे जाणे चालू असते. या दलालांचे व या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांचे कॉल डिटेल्स तपासल्यास त्यांचे लागेबांधे उघडकीस येतील. अश्या प्रकारे उद्योजकांचे मोठ्या प्रमाणात नियमितपणे आर्थिक शोषण चालू आहे.
प्रदूषण महामंडळाच्या कार्यालयात दलालांशिवाय कामच होत नाही, असा अनेकांचा अनुभव आहे. एखादा सरळमार्गी मनुष्य जर या कार्यालयातल्या अधिकाऱ्यांकडे काम घेऊन गेला, तर त्याच्या कामात अनेक त्रुटी दाखवल्या जातात. मात्र तेच काम जर दलालामार्फत एखादा घेऊन गेला तर ते काम ताबडतोब मार्गी लागतं. त्यामुळे या कार्यालयात प्रचंड आर्थिक ‘गडबड’ सुरू असून याकडे एसीबीने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या कार्यालयात दलालांचा राबता अनेक दिवसांपासून आहे. कारण या कार्यालयात मनुष्यबळ खूप कमी आहे. संपूर्ण राज्यात क्षेत्रफळाने सर्वात मोठा असलेला अहिल्यानगर जिल्हा आणि या जिल्ह्यातल्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी हाताच्या बोटांवर मोजता येतील, इतकेच अधिकारी या कार्यालयात आहेत. परिणामी या कार्यालयात दलालांशिवाय पान हलत नाही.
या कार्यालयातल्या दलालांवर करडी नजर ठेवत इथल्या आर्थिक ‘गडबडी’ चव्हाट्यावर आणण्याचे मोठं आव्हान अँटी करप्शन कार्यालयासमोर आहे. हे आव्हान नगर एसीबीचे अधिकारी आणि कर्मचारी कशा पद्धतीने पूर्ण करतात, हे पाहणे मोठे गंमतीचे ठरणार आहे.