पुण्यातील नवले पुलावर पहाटे भीषण अपघात, कारची बसला धडक; दोघांचा जागीच मृत्यू, चार जखमी
पुणे: शहरातील नवले पुलावर शनिवारी पहाटे एक भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव स्विफ्ट कारने उभ्या असलेल्या बसला मागून धडक दिली. आज सकाळी पाच वाजताच्या सुमारास बाह्यवळण महामार्गावर वडगाव ब्रिजजवळ हा भीषण अपघात झाला. अपघातात दोन जणांचा मृत्यू तर चार जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले असून उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील नवले पूल हा रहदारीचा रस्ता आहे. यावरून दिवस रात्र वाहनांची वर्दळ असते. अशातच शनिवारी पहाटे एक मोठी बस रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आली होती. पहाटे पाचच्या सुमारास एमएच १२ केडब्ल्यू ३६६३ ही स्विफ्ट कार नवले पुलावर भरधाव आली आणि या बसला मागून जोरात ठोकली. कारचा वेग इतका होता की कारचा पुढचा भाग काहीसा बिघडला. या कारमधून प्रवास करणारे मित्रमंडळी हे वाढदिवसाची पार्टी करून परतत होते. कारमधील सहा जणांपैकी दोन जणांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला. तर इतर चार जण जखमी झाले. तेथील नागरिकांनी आणि प्रवाशांनी या चार जखमी युवकांना आधी नवले हॉस्पिटलमध्ये दाखल केले, त्यानंतर पुढे त्यांना एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.