दि. 04/02/2024 रोजी तक्रारदार शोभा सतीश मंडलेचा (रा. स्पाईन रोड, आळंदी, ता. हवेली, जिल्हा- पुणे) या त्यांचे पती सतीश मंडलेचा यांच्यासोबत नातेवाईकांच्या लग्न सोहळ्यासाठी बडी साजन मंगल कार्यालय, अहमदनगर येथे आल्या होत्या. लग्न समारंभ उरकल्यानंतर त्या त्यांच्या पतीसह पुणे बस स्थानकावर आल्या. दुपारी साधारण 04.40 वा. चे सुमारास त्या फलाट नं. । येथे धुळे ते पुणे जाणा-या बसने पुण्याकडे जाण्याकरिता बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेवून अज्ञात चोरट्यानं त्यांचे डाव्या हातातली अंदाजे 2 तोळे वजनाची सोन्याची एक पाटली चोरुन नेली.
तक्रारदार शोभा सतीश मंडलेचा यांनी कोतवाली पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरुन गु.र.नं. 134/2024 भादंवि क. 379 प्रमाणे दि. 04/02/2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. शाहीद शेख हे करीत होते. दरम्यान, नगर – पुणे बस स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करण्यात येवून संशयित इसमांची माहिती घेण्यात आली.
गुन्ह्याचा तपास सुरु असताना पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीलायक बातमी मिळाली, की गुन्ह्यातील आरोपी हा अंबरनाथ (जिल्हा- ठाणे) येथील राहणारा असून तो चोरी केल्यानंतर त्याच्या गावी गेलेला आहे. पो. निरी. दराडे यांनी तात्काळ मिळालेल्या माहितीबाबत तपासी अंमलदार पोहेका शेख यांना माहीती देवून टीमसह आरोपीचा शोध घेणेकामी पोलीस स्टाफसह अंबरनाथ, (जिल्हा- ठाणे) येथे रवाना केलं.
पोहेका शाहीद शेख यांनी अंबरनाथ पोलीस स्टेशनचे स्थानिक पोलीस अंमलदार यांच्या मदतीने गुन्ह्यातील संशयित आरोपीचा अंबरनाथ शहरात शोध घेतला असता तो मिळून आला .
त्याला त्याचं नाव, गाव, पत्ता विचारला असता त्याने त्याचं नाव अभिषेक चंदन गागडे (वय 20 वर्षे, रा. फातिमा चर्च पाठीमागे, वाद्रापाडा, अंबरनाथ वेस्ट, ता. अंबरनाथ, जिल्हा- ठाणे) असं असल्याचं सांगितलं.
पोलिसांनी त्याला विश्वासात घेवून गुन्ह्याच्या अनुशंगानं तपास केला असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. परंतू मुद्देमालाबाबत माहिती देण्यास टाळाटाळ केली. नमूद आरोपीला तपासकामी कोतवाली पोलीस स्टेशन येथे आणून अटक करण्यात आली. आरोपी पोलीस अटकेत असताना अटक आरोपीचा नातेवाईक अमन सुरज गागडे (रा. अंबरनाथ, जिल्हा- ठाणे) यांनी कोतवाली पोलीस स्टेशन येथे हजर होवून गुन्ह्यातील आरोपीने चोरी केलेले 20 ग्रॅम वजनाची सोन्याची पाटली ही सोन्याच्या लगड स्वरुपात पंचासमक्ष हजर केली.
ती गुन्ह्याच्या तपासात जप्त करण्यात आली. सदरची संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, (अहमदनगर शहर विभाग) अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, सपोनिरीक्षक, योगीता कोकाटे, पोउपनिरीक्षक प्रविण पाटील, पो.हे.कॉ. तनवीर शेख, शाहीद शेख, पो.ना. अविनाश वाकचौरे, महिला पोलीस नाईक संगीता बडे, पो.कॉ. दिपक रोहोकले, सत्यजित शिंदे, तानाजी पवार, प्रमोद लहारे, अतुल काजळे, सुरज कदम, सोमनाथ केकान, शिवाजी मोरे, महेश पवार, अभय कदम, अमोल गाडे, याकुब सय्यद, मोबाईल सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंडु यांच्या पथकानं केली.