पिंपरी चिंचवडमध्ये रमाईंचे स्मारक होण्यासाठी पुढाकार घेणार: आमदार अमित गोरखे यांचे आंदोलकांना आश्वासन
पिंपरी, ता. २०: माता रमाई भीमराव आंबेडकर यांचे स्मारक पिंपरी चिंचवड परिसरामध्ये झाले पाहिजे, यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन आज विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी आंदोलनकर्त्यांना दिले.
माता रमाई भीमराव आंबेडकर यांचे स्मारकाचे भूमिपूजन येत्या ७ फेब्रुवारी २०२५ रोजी झाले पाहिजे, या मागणीसाठी आंदोलनकर्ते राजेंद्र साळवे यांच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन ऐतिहासिक भीमसृष्टी स्मारक पिंपरी या ठिकाणी सुरू आहे. यावेळी त्यांना भेट देऊन त्यांच्याशी आमदार गोरखे यांनी संवाद साधला. समोरच मनपा आयुक्त आणि पीएमपीएल आयुक्त यांना तत्काळ जागा सर्वे करून घेण्यात यावे असे आदेश ही दिले.
पिंपरी चौक या ठिकाणी स्मारक झाल्यास शहरातीलच नव्हे तर पुणे जिल्ह्यातील अनेक आंबेडकर प्रेमींना याचा आनंद होणार आहे ही भावना लक्षात घेऊन या स्मारकासाठी पुढाकार घेण्यार असून योग्य ती पावले उचलणार असल्याचे आ. गोरखे यावेळी म्हणाले.
या स्मारकाच्या निर्मितीसाठी आवश्यक ती प्रक्रिया करण्याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याशी संवाद साधून त्यांना याबाबत सूचना आ.गोरखे यांनी दिल्या आहेत.