पालघरः (योगेश चांदेकर) संसदेत आणि विधिमंडळात महिलांना आरक्षण देण्याचा कायदा मंजूर झाला असता तरी त्याची अंमलबजावणी 2019 च्या निवडणुकीपासून होणार आहे; परंतु पालघर लोकसभा मतदारसंघात मात्र आता पन्नास टक्के असलेल्या महिलांना या वेळी लोकसभेसाठी उमेदवारी मिळावी असा सर्वच पक्षावर दबाव वाढला असून महिला नेत्यांनी त्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपाच्या इच्छुक असलेल्या मीना धनारे यांनी तर लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष निवडणूक लढवण्याचा ठाम निर्धार केला आहे.
पालघर लोकसभा मतदारसंघाच्या स्थापनेपासून आतापर्यंत या मतदारसंघातून एकही महिला खासदार निवडून आलेली नाही. आजपर्यंत या मतदारसंघावर पुरुषांचे वर्चस्व राहिले आहे. लोकसभेच्या या निवडणुकीत पहिल्यांदाच सर्वंच पक्षातून महिलांचा उमेदवारीसाठी दबाव वाढला आहे. चारही प्रमुख पक्षाची उमेदवारी मिळावी, म्हणून महिलांनी प्रयत्नांची पराकाष्टा चालवली असून त्यांची नावे इच्छुक उमेदवारांच्या यादीत आहे.
पुरुषांच्या तुलनेत महिलाच जादा स्पर्धक
पालघर लोकसभा मतदारसंघात या वेळी उमेदवारी मिळावी, यासाठी भाजप, शिवसेना ठाकरे गट, बहुजन विकास आघाडी आणि शिवसेनेचा शिंदे गट या चारही प्रमुख पक्षातील महिलांनी उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे अन्य स्पर्धकांच्या तुलनेत महिलांची नावे पुढे येत आहेत. विशेष म्हणजे चारही प्रमुख पक्षातील महिला निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या, तर ही निवडणूक रंगतदार होईल.
उमेदवारी मिळाली नाही, तरी धनारे रिंगणात
राजकीय पार्श्वभूमी असलेल्या तसेच स्वकर्तुत्वाने विविध पदे मिळवलेल्या महिलांनी जशी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी चालवली आहे तसेच आतापर्यंत केवळ घर सांभाळणाऱ्या महिलाही आता निवडणुकीच्या राजकारणात उतरू इच्छित आहेत. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून अनेक महिला इच्छुक असल्या, तरी त्यात एक प्रमुख नाव डहाणू विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पास्कल धनारे यांच्या पत्नी मीना धनारे यांचे नाव पुढे येत आहे. पास्कल धनारे यांच्या राजकारणात फारसा सहभाग न घेतलेल्या आणि घर सांभाळणाऱ्या तसेच परिचारिका म्हणून काम करणाऱ्या मीना यांनी कोणत्याही परिस्थितीत लोकसभेची निवडणूक लढवायची असा निर्धार केला आहे.
भाजपच्या नेत्यांना साकडे
भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी मीना धनारे इच्छुक आहेत. त्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्यांशी चर्चा केली आहे. दिवंगत आमदार पास्कल धनारे यांनी डहाणू विधानसभा मतदार संघातील माकपचे वर्चस्व मोडीत काढत तिथे भाजपचे कमळ फुलवले. ते भाजपचे जिल्हाध्यक्ष होते. पालघर लोकसभा मतदारसंघातून त्यांच्या नावाची चर्चा होत होती. कोरोनाच्या काळात त्यांचे निधन झाल्यानंतर आता त्यांच्या पत्नी मीना यांनी पास्कल यांची पोकळी भरून काढण्यासाठी मतदारांच्या भावनेला हात घातला आहे.
मीना यांना अन्य पक्षांचाही पर्याय
मीना यांना बहुजन विकास आघाडी व जिजाऊ संघटनेने संपर्क साधला आहे. स्वतः मीना धनारे यांनीच याबाबत माहिती दिली आहे. भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली नाही, तर अन्य पक्षांचे पर्याय खुले आहेत. जिजाऊ संघटनेच्या नीलेश सांबरे यांच्या संघटनेतूनही ऑफर आल्याचे त्या सांगतात. प्रमुख तीन राजकीय पक्षांनी उमेदवारी दिली नाही तरीसुद्धा कोणत्याही परिस्थिती अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.
लोकांच्या सुखदुखात सत्ताधारी कोठे ?
शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भारती कामडी यांचे नाव चर्चेत आहे. ठाकरे यांनी त्यांच्या नावाबाबत सूतोवाच केले आहे. पालघर मतदारसंघातून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ गेल्यामुळे महाविकास आघाडीमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. महाविकास आघाडीला त्यांच्या यात्रेचा फायदा होईल भारती कामडी या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या. विरोधकांवर प्रखर टीका करताना त्या म्हणाल्या, की वाढवण बंदर प्रश्न आम्ही सामान्यांबरोबर आहोत. हे बंदर होऊ नये अशी येथील मच्छीमार, शेतकरी व अन्य लोकांची इच्छा आहे उद्धव ठाकरे यांनीही स्थानिकांबरोबर राहण्यास सांगितले आहे.
खा.गावितांचा बुलडोझर कुठे?
लोकसभेच्या मागच्या निवडणुकीच्या वेळेला खा. राजेंद्र गावित यांनी वाढवण बंदराला विरोध करताना हे बंदर झाले, तर पहिला बुलडोझर माझ्या अंगावरून जाईल असा इशारा दिला होता; परंतु आता त्यांचाच पक्ष आणि त्यांचे मुख्यमंत्री वाढवण बंदराचे समर्थन करत असताना गावित त्याबाबत काहीच का बोलत नाही, असा सवाल त्यांनी केला आहे. त्याचबरोबर विरोधकांनी जनतेच्या संकटाच्या काळात काहीच काम केले नाही, असा आरोप करून कोरोनाच्या काळात धान्य वाटपासह त सामान्य नागरिकांच्या दुःखात आम्ही सहभागी झालो होतो, असे कामडी सांगतात. अन्य पक्ष संपर्कात असले, तरी कोणत्याही परिस्थितीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला सोडणार नाही. उमेदवारी मिळाली नाही, तरी महाविकास आघाडी जो उमेदवार देईल, त्याचे काम करू, असे त्यांनी सांगितले.
निमकर, वाढाण यांचीही मोर्चेबांधणी
पालघर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी तीन विधानसभा मतदारसंघ बहुजन विकास आघाडीकडे आहेत. या आघाडीतून मनीषा निमकर यांचे नावही लोकसभेसाठी चर्चेत आहे. निमकर या पालघर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीच्या सभापती तसेच माजी मंत्री होत्या. त्यांच्या कामाची दखल पक्ष घेईल आपली अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. शिवसेनेच्या शिंदे गटाकडून खासदार गावित यांना होत असलेला विरोध पाहता जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष वैदेही वाढाण यांचे नाव चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर आता कोणत्या राजकीय पक्षाकडून महिलेला उमेदवारी मिळते आणि कोणती महिला पालघरची पहिली महिला खासदार होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.