राजकारणपालघर लोकसभा मतदारसंघ भाजपला.. भाजपकडून राजेंद्र गावित यांनाच उमेदवारी मिळणार..! गावितांसह अनेक...

पालघर लोकसभा मतदारसंघ भाजपला.. भाजपकडून राजेंद्र गावित यांनाच उमेदवारी मिळणार..! गावितांसह अनेक दिग्गज भाजपत प्रवेश करणार.,

spot_img

पालघरः पालघर लोकसभा मतदारसंघ महायुतीत भाजपला देण्यात आला आहे. या मतदारसंघातून विद्यमान खासदार राजेंद्र गावित हेच भाजपचे उमेदवार असतील यावर जवळजवळ शिक्कामोर्तब झाले आहे. गावित यांच्यासह अन्य पक्षातील अनेक दिग्गज दोन दिवसांत भाजपत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट आणि भाजप यांच्यात मतदारसंघाची अदलाबदली झाली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाला देण्याच्या बदल्यात शिवसेनेचा नाशिक लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला देण्यात आला आहे, तर ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे ठेवताना पालघर मतदार संघ भाजपला देण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाल्याचे समजते. त्यासाठी गेल्या दोन दिवस प्रचंड वाटाघाटी आणि चर्चा चालू होती.

मतदारसंघ आणि उमेदवारही घेतला
महायुतीत ठरल्यानुसार मतदारसंघ मित्रपक्षाला देताना उमेदवारही पुरवण्याचा नवा पायंडा पडत आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे सूत्र पालघर लोकसभा मतदारसंघात अंमलात आणले जात आहे. पालघर मतदारसंघ भाजपला देताना ठरलेल्या वाटाघाटीतील तरतुदीनुसार या मतदारसंघातील शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार राजेंद्र गावित यांना भाजप प्रवेश करायला लावून त्यांनाच उमेदवारी देण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते.

खा.गावितांविषयीची नाराजी दूर
खा. गावित यांच्या विषयी भाजपच्या एका गटाची नाराजी असली, तरी वरिष्ठ पातळीवरून या गटाची नाराजी दूर करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले असून कोणत्याही परिस्थितीत पालघर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचा उमेदवार जिंकला पाहिजे, अशा स्पष्ट सूचना भाजपच्या वरिष्ठांनी नाराज गटाला दिल्या असून आता हा आदेश शिरसावंध मानून महायुतीच्या नेत्यांना काम करावे लागणार आहे.

शिंदे सेनेची नाराजीही दूर
गावित यांच्याबरोबर काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या अनेक नेत्यांना भारतीय जनता पक्षात आणून पक्ष आणि संघटन आणखी मजबूत करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न चालू आहेत आणि स्थानिक नेत्यांना त्यासाठी विश्वासात घेण्यात आले आहे. त्याचबरोबर शिवसेनेच्या शिंदे गटाची नाराजी ही दूर करण्यावर वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली असल्याची समजते

भाजप-बहुजन विकास आघाडीतच लढत
या चर्चेतील तडजोडीनुसारच खासदार गावित भाजप प्रवेश करणार असून त्यावर एकमत झाले आहे. पालघर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून भारती कामडी यांची उमेदवारी जाहीर झाली असली, तरी आता भाजपचे खासदार गावित आणि बहुजन विकास आघाडीच्या संभाव्य उमेदवारात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.

गावित यांच्या मतपेढीचा विचार
खासदार गावित २०१८ च्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडूनच निवडून आले होते. त्यानंतर गेल्या वेळी पालघर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे देताना गावित यांनाही शिवसेनेत पाठवण्यात आले होते. पालघर जिल्हा निर्मिती आणि अन्य विकास कामात खासदार गावित यांनी दिलेले योगदान आणि त्यांच्या विकासाबाबतच्या संभाव्य योजना आणि त्यांच्या पाठीमागे असलेली मतपेढी विचारात घेऊन त्यांना पुन्हा भाजपत आणून उमेदवारी देण्यात येणार आहे. आता त्यांच्यासाठी महायुती मतभेदांना मूठमाती देऊन गावित यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..! अहमदनगर : जामगाव, ता. पारनेर,...

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...