पालघरः पालघर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांनी आज शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज की दाखल केला. युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हजर होते.
या वेळी त्यांनी भाजप गलिच्छ राजकारण करीत असल्याचा आरोप केला. कामडी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेनेसह महाविकास आघाडीने मोठे शक्तिप्रदर्शन केले. या वेळी आदिवासी एकता परिषदेचे काळूराम काका धोदडे, आमदार विनोद निकोले, आमदार सुनील भुसारा,पालघर लोकसभा संपर्क प्रमूख मिलिंद वैद्य आदी उपस्थित होते.
महाविकास आघाडीसोबत संपूर्ण महाराष्ट्र
या वेळी पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर कडवट टीका केली. पत्रकारांच्या प्रश्नांना तितक्याच आक्रमकपणे उत्तरे दिली. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर महायुतीचे नेते करीत असलेल्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला. महाविकास आघाडी सोबत संपूर्ण महाराष्ट्र असल्याचे चित्र असताना महायुतीला आणि भाजपला अजून उमेदवार सापडत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
पायाखालची वाळू सरकल्यानेच भाजप नेते वारंवार महाराष्ट्रात
महाराष्ट्रात महाविकास आघाडीला अतिशय चांगले वातावरण आहे, असे निदर्शनास आणून अन्य एका प्रश्नावर उत्तर देताना ठाकरे म्हणाले, की आज पालघरमध्ये भारती कांबडी यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी झालेली गर्दी ही महाविकास आघाडीवर लोकांचे प्रेम किती आहे याचे प्रतीक आहे. या उलट महायुतीला अजून उमेदवार मिळत नाही आणि महायुतीच्या ताब्यातून महाराष्ट्रमुक्त करण्याची प्रतिज्ञा जनतेने केली आहे, याची जाणीव झाल्यामुळेच भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना वारंवार महाराष्ट्राचे दौरे करावे लागत आहेत. भाजपच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे.
कामाबाबत महायुतीकडे सांगण्यासारखे काहीच नाही
गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रात कोणतीही प्रगती झालेली नाही.गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने काय केले, याबाबत महायुतीचे नेते काहीही बोलायला तयार नाहीत. नोटाबंदी, जीएसटी तसेच अन्य विकासाच्या मुद्द्यावर महायुतीचे नेते बोलत नाहीत. त्यांच्याकडे सांगण्यासारखे काही नसल्यामुळे आता ते गलिच्छ पातळीवरचे राजकारण करत आहेत, अशी टीका ठाकरे यांनी केली. या वेळी आदित्य ठाकरे यांनी वाढवण बंदरासह नाणारच्या मुद्द्यावरी आम्ही स्थानिक जनतेसोबत आहोत, असे सांगून पालघर लोकसभा मतदारसंघातून भारती कांबडी यांचा विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.