पालघरः पालघर लोकसभा मतदारसंघातून अखेर भारतीय जनता पक्षाने निष्ठावंत हेमंत सावरा यांना उमेदवारी दिली आहे. भारतीय जनता पक्षातून लोकसभा निवडणुकीसाठी चौघांची नावे चर्चेत होती; परंतु अखेर भाजपने निष्ठावंत कुटुंबालातील सदस्यालाच उमेदवारी देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. पालघर लोकसभा मतदारसंघात अखेरच्या क्षणी झालेला निर्णय अत्यंत धाडसी आणि आश्चर्यकारक आहे.
या मतदारसंघातून खा. राजेंद्र गावित यांना भाजपत आणून उमेदवारी देण्याचे चर्चा होती; परंतु खासदार गावित प्रचाराला लागण्यास सांगूनही ऐनवेळी त्यांची उमेदवारी कापण्यात आली. खा.गावित यांना हा मोठा धक्का असून आता ते काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे. खा गावित गेल्या सहा वर्षापासून पालघरचे खासदार असून पालघर जिल्ह्याच्या निर्मितीपासून अनेक कामात त्यांचे योगदान आहे. त्यांना वरिष्ठांनी लोकसभा निवडणुकीचे काम करण्यास सांगितले होते. त्यानुसार त्यांनी प्रचाराची एक फेरीही पूर्ण केली होती.
ठाणे-नाशिकच्या बदल्यात पालघरवर पाणी
महायुतीतील जागा वाटपात नाशिक, ठाण्याची जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ताब्यात ठेवण्यात यश मिळाले असले, तरी पालघरच्या जागेवर मात्र पाणी सोडावे लागले. पालघरची जागा भारतीय जनता पक्षाला देण्याचे पूर्वीच निश्चित झाले होते; परंतु भाजपला जागा सोडताना शिरूर व अन्य मतदारसंघांप्रमाणे उमेदवार आयात केला जाईल अशी शक्यता व्यक्त होत होती. २०१८ मध्ये काँग्रेसमधून भाजपत जाऊन खासदारकी मिळवलेल्या आणि २०१९ च्या निवडणुकीत मतदारसंघ शिवसेनेला गेल्यानंतर उमेदवारही भाजपने पुरवला होता. २०१९ मध्ये शिवसेनेतून निवडून आल्यानंतर गेल्या दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या खा. गावित यांना या वेळी मात्र थांबावे लागले आहे.
नकारात्मक अहवाल उमेदवारीच्या आड
दोन दिवसांपूर्वी खा. गावित यांनी उमेदवारी मिळाली नाही, तर काय करणार या प्रश्नावर आपण वरिष्ठांशी बोलून निर्णय घेऊ असे सांगितले होते. आता खा. गावित काय करणार याकडे लक्ष लागले आहे. खा. गावित यांना राजकीय पुनर्वसनाबाबत आश्वस्त केल्याशिवाय या मतदारसंघात भाजपला यश मिळणे अवघड आहे. भारतीय जनता पक्षापासून सुरुवातीपासून खासदार गावित यांच्या नावाला विरोध होता. त्यावरून शिवसेना आणि भाजपत कलगीतुराही रंगला होता. शिवसेनेच्या एका गटाचाही खासदार गावित यांना विरोध होता. त्यांच्याबाबत नकारात्मक अहवाल त्यांच्या उमेदवारीच्या आड आला.
दगाफटका टाळण्यासाठी उशिरा नाव जाहीर
खा. गावित हे काही महिन्यांपासून भाजपच्या राज्यातील तसेच केंद्रातील नेत्यांच्या संपर्कात होते; मात्र निवडणूकपूर्व चाचणी अहवाल खा. गावित यांना अनुकूल नसल्याने भाजपने इतर उमेदवारांची चाचपणी सुरू ठेवली होती. भाजपतर्फे डॉ. हेमंत सवरा, भाजपचे लोकसभा प्रभारी संतोष जनाथे, बोईसरचे माजी आमदार विलास तरे यांची नावे चर्चेला होती. शिवसेनेचे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्यासह पालघरचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांच्या नावावरदेखील विचार सुरू होता. खा. गावित यांच्यासह सर्व इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज व त्यासाठी लागणारे प्रतिज्ञापत्र तयार करून ठेवण्याच्या गुप्त सूचना देण्यात आल्या होत्या. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा अधिकृत उमेदवारी दाखल होईपर्यंत दगा फटका होईल या भीतीपोटी महायुतीने उमेदवारी जाहीर करण्याचे टाळले होते; मात्र जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भारती कामडी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच भाजपतर्फे डॉ. सावरा यांच्या नावाची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली.
सावरा यांची राजकीय पार्श्वभूमी
भारतीय जनता पक्षाने पालघर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिलेले हेमंत सावरा हे माजी मंत्री विष्णू सावरा यांचे चिरंजीव आहेत. विष्णू सावरा हे वाडा मतदारसंघातून अनेकदा आमदार झाले. त्यांना भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले होते. १९८० मध्ये भाजपचे काम करण्यासाठी त्यांनी स्टेट बँकेतील नोकरीवर पाणी सोडले. अगोदर वाडा आणि नंतर भिवंडी ग्रामीण मधून १९९०, १९९५, १९९९, २००४ आणि २००९ मध्ये आमदार झाले. २०१४ मध्ये ते विक्रमगड मतदारसंघातून ते आमदार होते. गेल्या चार वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. भाजपने आता त्यांच्याच कुटुंबातील हेमंत सावरा यांना उमेदवारी दिली आहे. २०१९च्या निवडणुकीत डॉ.हेमंत सावरा भाजपतून विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभे होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील भुसारा यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. आता पक्षाने त्याच्यावर मोठी जबाबदारी टाकली असून त्यांना लोकसभेसाठी उमेदवारी दिली आहे.
राजकीय स्थिती
पालघर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचा एकही आमदार नसला, तरी भाजपला मानणाऱ्या मतदारांची संख्या मोठी आहे; शिवाय त्यांच्या उमेदवारीने पक्षातही नाराजीचे काही कारण राहिलेले नाही. फक्त शिवसेनेतील खासदार गावित व त्यांच्या समर्थकांची नाराजी कशी दूर करायची हे मोठे आव्हान भाजपपुढे आहे. कारण ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या शिंदे गटाने नरेश मस्के यांना उमेदवारी दिल्यानंतर या मतदारसंघातून इच्छुक असलेल्या माजी खासदार संजीव नाईक यांच्या समर्थकांनी सामूहिक राजीनाम्याचे अस्त्र उगारले आहेत. त्यामुळे ठाण्याचे पडसाद पालघरमध्ये उमटतील की काय अशी भीती व्यक्त होत आहे.