पाथर्डी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यासह ठेकेदाराविरुद्ध कठोर कारवाई करणार; राष्ट्रीय महामार्गाच्या उपविभागीय अभियंत्याचं उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन…!
महासत्ता भारत / अहिल्यानगर
विनापरवाना खोदकाम करत 100 वर्षांपूर्वीचं डेरेदार झाड तोडून पर्यावरणाचं प्रचंड नुकसान करणाऱ्या पाथर्डी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यासह ठेकेदाराविरुद्ध कठोर कारवाई करण्यासंदर्भातलं लेखी आश्वासन राष्ट्रीय महामार्गाच्या उपविभागीय अभियंत्यानं उपोषणकर्त्यांना नुकतंच दिलंय.
यासंदर्भात पाथर्डीतल्या मेहेर टेकडी या भागातले शन्नो उर्फ शमाली पठाण यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाला आमरण उपोषणाचं निवेदन दिलं होतं. या निवेदनाची गंभीर दखल घेत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या उपविभागीय उपअभियंत्याने सदरचं आमरण उपोषण मागे घेण्याची विनंती करत पाथर्डी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी तसंच संबंधित ठेकेदाराविरुद्ध कारवाई करण्याचं उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासनाचं पत्र दिलंय.
वास्तविक पाहता हा खूपच गंभीर विषय आहे. केंद्र आणि राज्य सरकारी एकीकडे पर्यावरण वाचण्यासाठी कोटी रुपयांच्या जाहिराती देत आहे. मात्र ऑक्सिजनची निर्मिती करणारे डेरेदार वृक्ष कुठल्याही परिणामाचा विचार न करता पाथर्डीच्या मुख्याधिकाऱ्यांनी शंभर वर्षांपूर्वीचं झाड तोडण्याचे आदेश दिले.
या झाडाची ठेकेदार मार्फत कत्तल करण्यात आली. दरम्यान, या ठिकाणी करण्यात आलेल्या खोदकामाचा आणि झाड तोडणल्याचा अहवाल राष्ट्रीय महामार्गाकडून नगरपरिषदेला मागविण्यात आला आहे. लेखी आश्वासनामुळे सदरचं उपोषण तूर्तास स्थगित करण्यात आल्याची माहिती आहे.