अहमदनगर – पाथर्डी नगरपरिषदेच्या घनकचरा डेपोत प्रचंड अनागोंदी कारभार सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. वजन काट्याचं काम अपूर्ण असतानासुद्धा फायनल बिलं काढून घेतली जाताहेत. पाथर्डी नगरपरिषदेच्या या भोंगळ कारभाराबद्दल सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
या कचरा डेपोत ओला सुका कचरा हा ठेकेदारानं मोजून घेतला पाहिजे. मात्र वजनाची एकही पावती नाही. घनकचरा डेपो येथे बसविलेला वजनाचा काटा हा अक्षरशः लोखंडी सांगाडाच आहे.
लोखंडी सांगडा बसवून फायनल बिलं काढून घेतले आहेत. गावातून ओला आणि सुका कचरा जमा करून घनकचरा डेपोत नेला जातो. त्यावर कुठलीही खत निर्मितीची प्रक्रिया होत नसल्यानं तिथं फक्त खत निर्मितीच्या नावावर फक्त पैसे उकळण्याचं काम सुरु आहे.
दर वर्षाला आरोग्य विभाग व घनकचरा डेपो यासाठी दोन कोटी रुपये खर्च होतो. घनकचरा डेपोत बसविण्यात आलेल्या वजन काट्यात जो गैर व्यवहार केला जात आहे, त्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्यात येऊन संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई यावी, अशी मागणी केली जात आहे.