दिनांक 22/2/24 रोजी अर्जुन कारभारी चौधरी (वय 54, धंदा चेअरमन शिवराय ग्रामीण पतसंस्था, पारनेर रा. संभाजीनगर, ता. पारनेर) हे चेअरमन असलेल्या शिवराय ग्रामीण पतसंस्थेचे कोणी तरी अज्ञात चोरट्याने शटर व आतील काचेच्या दरवाजाचे लॉक तोडून आत प्रवेश करत 40 हजार रुपये रोख रक्कम चोरुन नेली. याबाबत पारनेर (जिल्हा : अहिल्यादेवी नगर ) पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 121/2024 भादंविक 457, 380 प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची घटना घडल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अधीक्षक यांनी पोनि दिनेश आहेर यांना गुन्हा उघडकीस आणणे बाबत आदेशित केले होते. सदर आदेशानुसार पोनि आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि समाधान भाटेवाल व अंमलदार भाऊसाहेब काळे, दत्तात्रय गव्हाणे, रविंद्र कर्डिले, संदीप दरंदले, देवेंद्र शेलार, विजय ठोंबरे, सागर ससाणे, चंद्रकांत कुसळकर व अरुण मोरे यांचे पथक नेमुन सदर गुन्हा उघडकीस आणणेबाबत आवश्यक सुचना देऊन पोलीस पथकास रवाना केले.
या पोलीस पथकाने घटना ठिकाणास भेट देऊन घटना ठिकाणचे व आजु बाजूचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले. त्यामधील संशयितांची गुप्तबातमीदारांमार्फत माहिती घेत असताना, या पथकास दिनांक 23/03/24 रोजी पारनेर कांदा मार्केट येथे झारखंड राज्यातील हमाल आलेले असून त्यांनी त्यांच्या मुंबई येथील साथीदारांसह वरील प्रमाणे गुन्हा केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
या पोलीस पथकानं त्या माहितीच्या अनुषंगाने पुढील तपास करुन संशयित इसम नामे सईद नूरहसन शेख (रा. डोंगरी, मुंबई) हा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले.
त्याला पोलीस पथकाची ओळख सांगून त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) सईद नुरहसन शेख (वय 29, हल्ली रा. सोलापुर स्ट्रीट हायवे शेजारी, डोंगरी, मुंबई मुळ रा. साहेबगंज राज्य झारखंड) असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे वर नमूद गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्याने सदरचा गुन्हा त्याचे इतर साथीदार नामे जोहरआलम असादअली शेख (रा. कांदा मार्केट जवळ, ता. पारनेर) व कल्लु ऊर्फ महंमद शेख (रा. नवी मुंबई) यांचे सोबत मिळून गुन्हा केल्याचे सांगितलं.
या पोलीस पथकानं उर्वरित आरोपींचा शोध घेतला असता आरोपी नामे 2) जोहरआलम असादअली शेख (रा. कांदा मार्केट जवळ, ता. पारनेर) हा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले. आरोपीचा साथीदार नामे 3) कल्लु ऊर्फ महंमद शेख (रा. नवी मुंबई) (फरार) याचा शोध घेतला. परंतु तो मिळून आला नाही.
ताब्यात घेतलेल्या आरोपींची पंचांसमक्ष अंगझडती घेता त्यांचे अंगझडतील 30 हजार रुपये रोख रक्कम मिळून आली. सदर रोख रकमेबाबत विचारपूस केली असता आरोपींनी पतसंस्थेतून चोरी केलेली रक्कम असल्याचे सांगितल्यानं आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेवुन पारनेर पोलीस ठाण्यात.स्टे.(गु.र.नं. 121/2024 भादंवि कलम 457, 380) प्रमाणे दाखल गुन्ह्याचे तपासकामी पारनेर पोलीस स्टेशन येथे हजर केलं. पुढील तपास पारनेर पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, संपत भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी, ग्रामीण विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.