नेवासे सब रजिस्ट्रार अर्थात दुय्यम निबंधक कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले नाहीत. हे कार्यालय बेकायदेशीर दस्त नोंदण्याचं काम करतंय. असे गंभीर आरोप सब रजिस्ट्रार अंबादास जगन्नाथ पवार यांच्या विरोधात नेवासे वकील संघाच्या सदस्यांनी केले आहेत. या संदर्भात तहसील कार्यालयासह पोलीस अधीक्षक कार्यालय आणि अँटी करप्शन विभागाला नुकतंच निवेदन देण्यात आलंय.
यावेळी पत्रकारांशी बोलताना वकील बांधवांनी असादेखील आरोप केला आहे, की या कार्यालयात दोन ते तीन गुंठ्यांचे दस्त नोंदवले जातात. प्रत्येक दस्त नोंदणी मागे एक हजार रुपये घेतले जाताहेत. सब रजिस्ट्रार पवार यांचा मुलगादेखील या ठिकाणी पैसे गोळा करण्यासाठी हजर असतो.
वास्तविक पाहता वकील मंडळी चांगल्या प्रकारची आणि कायदेशीर दस्त नोंदणी व्हावी, यासाठी सर्वसामान्य लोकांना सहकार्य करत असतात. मात्र सब रजिस्ट्रार पवार यांनी दोन दिवसांपूर्वी एका वकील बांधवाला अरेरावी करत खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. त्यामुळे सब रजिस्ट्रार पवार यांना निलंबित करण्याची मागणी करत या संदर्भात रस्त्यावर उतरण्याचा इशारा वकील संघानं दिला आहे.