पालघरः भिवंडी लोकसभा मतदारसंघ आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाकडे जाण्याची जास्त शक्यता आहे. भाजपने कपिल पाटील यांना उमेदवारी दिली असून भिवंडी लोकसभा मतदारसंघात आता तिरंगी लढत अटळ आहे.
जिजाऊ संघटनेच्या नीलेश सांबरे यांचे कार्यकर्त्यांचे जाळे आणि सामाजिक काम याचे मोठे दडपण आता अन्य उमेदवारांवर आले आहे. सांबरे यांनी ठाणे व पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.
हजारो युवक स्पर्धा परीक्षेतून अधिकारी
नवभारत के शिल्पकार, युथ आयकॉन अवॉर्ड, महासन्मान अवार्ड, कोकण ॲवार्ड, भूमिपुत्र पुरस्कार अशा कितीतरी पुरस्कारांनी सांबरे यांना सन्मानित करण्यात आले आहे. आदिवासी भागात त्यांनी केंद्रीय परीक्षा मंडळाच्या शाळा, महाविद्यालय सुरू केली आहे. त्याचबरोबर केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी त्यांच्या संस्थांमार्फत करून घेतली जाते. आतापर्यंत सुमारे सुमारे दोन हजार युवक केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग व पोलिस अकादमीच्या माध्यमातून वेगवेगळ्या सेवेत दाखल झाले आहेत.
अहर्निश आरोग्य सेवा
सांबरे यांचे आरोग्य सेवेतही मोठे काम आहे. १३० खाटांच्या रुग्णालयात मोफत उपचार केले जातात. दररोज सरासरी २५ मोतीबिंदू शस्त्रक्रिया या ठिकाणी केल्या जातात. १५ रुग्णवाहिकांच्या माध्यमातून रुग्णसेवा चालविली जाते. दोनशे रक्त संकलन शिबिर, पाचशे आरोग्य तपासणी शिबिरे, डोळे तपासणीची १०२ शिबिरे अशा वेगवेगळ्या शिबिरांतून त्यांची आरोग्यसेवा सुरू आहे.
सक्षमीकरणाला लाखो महिलांचा प्रतिसाद
महिला सक्षम सशक्तीकरणासाठी त्यांनी फार मोठे काम केले आहे. आशा सेविका व अन्य दुर्बल महिलांना दहा हजार पैठण्यांचे वाटप, पेपर प्लेट मशीनचे वाटप, सिलाई मशीनचे वाटप, सामाजिक सुधारणांमधून बस स्टॅन्ड, शेतकरी प्रशिक्षण, कृतज्ञता सभा, करिअर गायडन्स कॅम्प, असे उपक्रम त्यांनी राबवले आहेत पाच लाख लोकांसाठी कौशल्यता आधारित विकास कार्यक्रम राबवण्यात आले आहेत.
महिला उद्योजकतेचे केंद्र
राज्य पातळी कबड्डी स्पर्धा, राष्ट्रीय पातळीवरील कबड्डी स्पर्धा, कोकण वर्षा मॅरेथॉन, टेनिस क्रिकेट स्पर्धा, अशा वेगवेगळ्या स्पर्धा ते आयोजित करीत असतात. सांबरे यांच्या या सामाजिक कामामुळे सुमारे एक लाख वीस हजार महिला त्यांच्याशी जोडल्या आहेत दोन हजार ३३६ महिला बचत गट वेगवेगळी उत्पादने घेत असून महिलांना रोजगार मिळाला आहे. जिजाऊ संघटनेच्या अशा गृहोद्योगामार्फत हजारो महिलांना प्रशिक्षण, कौशल्य विकास आदी उपक्रमात सहभागी करून घेतले जाते. या महिला उद्योगामार्फत पत्रावळी मशीन, हस्तकला उद्योग व अगरबत्ती बनवणे, वस्त्रोद्योग असे विविध उपक्रम राबवले जातात.
रंजल्या गांजलेल्यांसाठी
अपंगासाठी निवासी शाळा असून १५१ विद्यार्थ्यांना दत्तक घेण्यात आले आहे. कोकण विभागात सातत्याने शेती विकासाचे विविध उपक्रम राबवले जातात. याशिवाय युवकांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण दिले जातात त्यात मोटर मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, नर्सिंग एमएससीआयटी अँड टॅली अशा प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून दिला जातो. आपत्ती काळात मदत करणे हे तर सांबरे यांचे वैशिष्ट्य आहे कोविडकाळात पाचशे खाटांचे रुग्णालय चालवणे असो की कोकणमध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या काळात वेगवेगळ्या ठिकाणी पूरग्रस्तांना वेगवेगळ्या स्वरूपाची मदत करणे; असे विविध उपक्रम त्यांनी राबवले आहेत.
राजकारणाला समाजमान्यता
सामाजिक संघटनेच्या जीवावर राजकारण करताना समाजकारणाचा निलेश सांबरे विसर पडू देत नाहीत. त्यांच्या संघटनेचे जिल्हा परिषदेचे १४ सदस्य असून ८३ गावात सरपंच निवडून आले आहेत. याशिवाय ३२ नगरसेवक आहेत. त्यांची मदत आता लोकसभा निवडणुकीत होणार आहे.